पुणे : दिवाळीच्या काळातील फटाक्यांच्या आवाजामुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाची वारंवार चर्चा होते. प्रत्यक्षात प्रत्येक फटाक्यापासून ध्वनिप्रदूषण होत असल्याची बाब महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ताज्या आकडेवारीतून समोर आली आहे. यामुळे फटाके वाजविल्यानंतर प्रदूषण होणार असल्याने त्यावर कारवाई कोण करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दरवर्षी फटाक्यांच्या आवाजाची चाचणी घेतली जाते. यंदाही फटाक्यांच्या आवाजाची चाचणी घेण्यात आली. यातील सर्वच फटाके आवाजाच्या चाचणीत नापास झाले आहेत. कारण सर्व फटाके ध्वनिप्रदूषणाच्या निश्चित पातळीपेक्षा जास्त आवाज करीत आहेत. निवासी क्षेत्रात दिवसा ५५ डेसिबल तर रात्री ४५ डेसिबल आवाज ध्वनिप्रदूषण ठरतो. याचवेळी शांतता क्षेत्रात ही मर्यादा दिवसा ५० आणि रात्री ४० डेसिबल, व्यावसायिक क्षेत्रात दिवसा ६५ आणि रात्री ५५, औद्योगिक क्षेत्रात दिवसा ७५ आणि रात्री ७० डेसिबल अशी आहे. या सर्व विभागांतील कमाल मर्यादा पातळीपेक्षा छोट्या फटाक्यांचा आवाजही अधिक आहे. यामुळे ध्वनिप्रदूषण नियमांचा भंग होत आहे.

हेही वाचा >>> पुणेकर बंडखोरांना ‘योग्य जागा’ दाखवितात!

मंडळाने केलेल्या आवाज चाचणीत लवंगी फटाक्यांच्या लडीची आवाज पातळी ८१ डेसिबल नोंदविण्यात आली. रंगीबेरंगी पाऊसमुळे ६८ ते ८० डेसिबल आवाज होत आहे. याचवेळी सुतळी बॉम्बचा आवाज ७९ डेसिबल नोंदविण्यात आला. भुईचक्रांमुळेही ६५ ते ७५ डेसिबल आवाज होत आहे. रॉकेटचा आवाज ७२ डेसिबल आहे. तसेच, ३० शॉट फटाक्यांमुळे ७५ डेसिबलचा आवाज होत आहे. त्यामुळे एकही फटाका ध्वनिप्रदूषण पातळीच्या नियमांचे पालन करीत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा >>> दोन जागा आणि ‘रिपाइं’ खुश; घेतला हा निर्णय !

कारवाई करणार कोण?

शहरात फटाके वाजविण्यामुळे होणारे ध्वनिप्रदूषण आणि हवा प्रदूषण या गंभीर समस्या बनल्या आहेत. असे असले तरी फटाक्यांच्या ध्वनिप्रदूषणावर कारवाई करण्याबाबत सरकारी यंत्रणांनी मौन धारण केले आहे. एखाद्या व्यक्तीने कोणताही फटाका वाजविला तरी ते ध्वनिप्रदूषण ठरणार आहे. यामुळे सरकारी यंत्रणांकडून फटाके वाजविणाऱ्या व्यक्तीवर की फटाक्यांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई होणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

फटाक्यांचा आवाज (डेसिबलमध्ये)

– सुतळी बॉम्ब – ७९

– पाऊस – ८०

– रॉकेट – ९२

– ३० शॉट – ७५

– लवंगी लड – ८१