पुणे : आवश्यक ते नियम पाळले नाही म्हणून इतरांवर कारवाईचा बडगा उगारणाऱ्या पुणे महापालिकेलाच कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. नियमांचे पालन न केल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) महापालिकेच्या दोन रुग्णालयांना नोटीस बजावली आहे. जैव वैद्यकीय कचऱ्या संदर्भात नियमांचे पालन न केल्याबद्दल ही नोटीस देण्यात आली आहे.
पुणे महापालिकेच्या मित्रमंडळ चौक, टिंबर मार्केट येथील हॉस्पिटलला या नोटीस देण्यात आली आहे. पालिकेची ही दोन हॉस्पिटल जैव वैद्यकीय कचरा याबाबत नियमांचे पालन करत नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ही पावले उचलण्यात आली आहेत. या कारवाईमुळे शहरातील इतर संस्था, हॉस्पिटलवर कारवाई चा धाक दाखविणाऱ्या पालिका प्रशासनाच्या दिव्याखाली अंधार असल्याचे यानिमित्त समोर आले आहे.
हे ही वाचा… पुणे : दुचाकीस्वाराची मुजोरी; पोलीस हवालदाराला फरफटत नेले, पोलिसांकडून गुन्हा
ही नोटीस दिल्यापासून एका महिन्याच्या आत एक वेगळे जैव वैद्यकीय कचऱ्या संदर्भात स्टोरेज सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना या नोटीसीतून देण्यात आल्या आहेत. एमपीसीबीचे प्रादेशिक अधिकारी जे.एस.साळुंखे यांनी ही नोटीस जारी केली आहे. यामुळे एक महिन्याच्या आत बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट नियम, २०१६ नुसार वेगळ्या जैव वैद्यकीय स्टोरेज सुविधा पुरवणे बंधनकारक आहे.
याचा वार्षिक अहवाल तसेच सांडपाणी प्रक्रिया सुविधेचा तपशीलही एक महिन्याच्या आत सादर करण्याच्या देखील सूचना प्रदूषण मंडळाने महापालिकेच्या या दोन्ही हॉस्पिटलला दिलेल्या आहेत. यापूर्वी देखील प्रदूषण नियंत्रण महामंडळाने या हॉस्पिटल ला पहिली एक नोटीस दिली होती. त्यानंतर देखील आवश्यक ती काळजी न घेतल्याने आता पुन्हा ही नोटीस बजावण्यात आली आहे.
हे ही वाचा… पुणे : पतीच्या त्रासामुळे महिलेची मुलीसह विहिरीत उडी मारून आत्महत्या,पतीला दहा वर्षे सक्तमजूरी
काय म्हंटले आहे ‘ एमपीसीबी’ ने
या दोन्ही हॉस्पिटलला ‘ एमपीसीबी’ ने जैव वैद्यकीय स्टोरेजचे रेकॉर्ड राखून ठेवण्याला सांगितले आहे. तसेच बायोमेडिकल वेस्टचे वर्गवारीनुसार विलगीकरण करून त्याची विल्हेवाट लावेपर्यंत रंगीत कोडेड पिशव्यांमध्ये हा वैद्यकीय कचरा साठवून ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सात दिवसांमध्ये कृती अहवाल सादर करण्यास सांगितले होते. मात्र याकडे देखील या दोन्ही हॉस्पिटलने दुर्लक्ष केल्याचे पुढे आले आहे.
© The Indian Express (P) Ltd