पुणे : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी मर्सिडिज बेंझच्या चाकणमधील प्रकल्पाची गेल्या महिन्यात केलेली पाहणी वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. त्यातच आता मंडळाने मर्सिडीज बेंझला नोटीस बजावली असून, पर्यावरण नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका कंपनीवर ठेवला आहे. या नोटिशीला उत्तर देण्यास कंपनीला १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
हेही वाचा >>> पिंपरी : श्वान पथकाला मिळणार बळ; गुन्ह्यांची उकल करण्यास होणार मदत
मंडळाने मर्सिडीज बेंझच्या चाकणमधील प्रकल्पाला शुक्रवारी (ता.२१) नोटीस बजावली. मंडळाच्या अधिकाऱ्यांनी २३ ऑगस्ट व ४ सप्टेंबरला या प्रकल्पाला भेट देऊन तपासणी केली होती. नोटिशीत म्हटले आहे की, प्रदूषण नियंत्रण नियमांचे पालन कंपनीकडून होत नाही. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील क्लॅरिफायर्स आणि सेंट्रीफ्यूज युनिट काम करीत नाहीत. डिझेल इंजिनांसाठीच्या उत्सर्जन नियंत्रण उपकरणे बसविण्यास सांगूनही त्याचे पालन केलेले नाही. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प योग्यरित्या चालविला जात नाही आणि त्याची देखभालही केली जात नाही.
हेही वाचा >>> “लवकरच आरोग्य हक्क कायदा”, ‘जनस्वास्थ्य’च्या प्रकाशन सोहळ्यात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची घोषणा
कंपन्या पर्यावरण नियमांचे पालन करीत आहेत का, याची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून तपासणी केली जाते. मंडळाचे अधिकारी आणि कर्मचारी ही तपासणी करतात. मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम हे २३ ऑगस्टला पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त आले होते. त्यांनी अचानक मंडळाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन मर्सिडीज बेंझच्या चाकणमधील प्रकल्पाची पाहणी केली. मर्सिडीजच्या भेटीबाबत आणि नियमांच्या उल्लंघनाबद्दल समाज माध्यमावर पोस्ट करण्यात आली. मात्र नंतर ती काढून टाकण्यात आल्याने या भेटीचे नेमके प्रयोजन काय होते, असा प्रश्न उपस्थित झाला होता.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी मर्सिडीज बेंझच्या चाकण प्रकल्पाची तपासणी केली होती. त्यात अनेक प्रदूषण नियमांचे उल्लंघन आढळून आले. त्यामुळे कंपनीला नोटीस बजावली असून, १५ दिवसांत उत्तर देण्यास सांगितले आहे. – जगन्नाथ साळुंखे, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीस कंपनीला मिळाली आहे. या नोटिशीतील मुद्द्यांचा अभ्यास करून तिला उत्तर देण्यात येईल. आमची शासकीय यंत्रणांना सहकार्य करण्याची भूमिका आहे. – मर्सिडीज बेंझ इंडिया