लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : पद्मावतीतील तळजाई वसाहतीत दहशत माजविणाऱ्या गुंडाविरुद्ध झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले. गुंडाला वर्षभरासाठी नागपूर कारागृहात स्थानबद्ध करण्यात येणार आहे.

साहिल ऊर्फ भावड्या संतोष कुचेकर (वय २१ रा. तळजाई वसाहत, पद्मावती ) असे कारवाई करण्यात आलेल्या गुंडाचे नाव आहे. त्याच्याविरूद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. आदेशाचा भंग करुन दहशत निर्माण करणे, दुखापत करणे, वाहनांची तोडफोड करणे, जबरी चोरी, तसेच खुनाचा प्रयत्न करणे असे गंभीर स्वरुपाचे पाच गु्न्हे दाखल आहेत. पोलिसांनी कुचेकरविरुद्ध प्रतिबंधक कारवाई केली होती. मात्र, त्याच्या वर्तणुकीत फरक पडलेला नव्हता. तळजाई वसाहत परिसरात त्याने नागिरकांना शस्त्राचा धाक दाखवून मारहाण केली होती. त्याच्या दहशतीमुळे नागरिक तक्रार करत नव्हते.

सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड यांनी त्याच्याविरुद्ध ‘एमपीडीए ’ कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. २३ जानेवारी रोजी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी त्यच्याविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले होते. कारवाईची कुणकुण लागताच तो पसार झाला होता. पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत होता. कुचेकर सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात असलेल्या शिखर शिंगणापूर परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याला सापळा लावून शिखर शिंगणापूर परिसरातून ताब्यात घेतले.

परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक सुरेखा चव्हाण, सहायक निरीक्षक सागर पाटील, बापू खुटवड, भाऊसाहेब आहेर, अमोल पवार, महेश मंडलिक, सागर सुतकर, विनायक येडके, ढगे यांनी ही कारवाई केली.

Story img Loader