पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगा(एमपीएससी)तर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली. त्यात विनायक पाटील यांनी राज्यात पहिला क्रमांक मिळवला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एमपीएससीने सर्वसाधारण गुणवत्ता यादी आणि संबंधित माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध केली. राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ विविध २३ संवर्गातील ६१३ पदांसाठी घेण्यात आली होती. राज्यसेवेची आतापर्यंतची सर्वाधिक पदांची भरती प्रक्रिया असल्याने राज्यभरातील उमेदवारांचे या निकालाकडे लक्ष लागले होते. एमपीएससीने जाहीर केलेल्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये धनंजय बांगर यांनी राज्यात द्वितीय, तर सौरभ गावंडे यांनी तृतीय क्रमांक मिळवला. यादीमध्ये एकूण १८३० उमेदवारांचा समावेश आहे.

हेही वाचा >>> मुलाखती संपताच एका तासात निकाल जाहीर

सर्वसाधारण गुणवत्ता यादी तात्पुरत्या स्वरूपाची आहे. अर्जामधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी प्रमाणपत्रे, कागदपत्रे पडताळणी करताना काही उमेदवारांच्या दाव्यामध्ये बदल होऊ शकतो. तसेच उमेदवाराचा गुणवत्ताक्रम बदलू शकतो. न्यायालयात, न्यायाधिकरणात दाखल न्यायिक प्रकरणांतील अंतिम न्यायनिर्णयाच्या अधीन राहून सर्वसाधारण गुणवत्तायादी जाहीर केली आहे.

परीक्षेतील पदांसाठी पसंतीक्रमाचे पर्याय सादर करण्यासाठीची प्रक्रिया २२ जानेवारीपासून सुरू करण्यात येणार आहे. अधिसूचित संवर्ग-पदांसाठी १ ते २३ यातील पसंतीक्रम निवडणाऱ्या उमेदवारांचा त्यांनी दिलेल्या पसंतीक्रमानुसार सर्व पदांवरील निवडीसाठी विचार होईल. २३ संवर्गापैकी ज्या पदावरील निवडीसाठी इच्छुक आहे, केवळ त्याच पदासाठी पसंतीक्रम सादर करावेत. निवडीसाठी इच्छुक नसलेल्या पदासाठी ‘नो प्रेफरन्स’ हा पर्याय निवडावा. पसंतीक्रम सादर केल्यानंतर त्याची पीडीएफ उमेदवाराला डाउनलोड करून जतन करता येणार आहे.

राज्यात पहिल्या आल्याचा खूपच आनंद झाला. मी मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड येथील आहे. आई-वडील शेती करतात. राज्यसेवेचा माझा दुसरा प्रयत्न होता. पहिल्या प्रयत्नातून उपशिक्षणाधिकारी पदासाठी निवड झाली आहे. मी संख्याशास्त्र विषयात फग्र्युसन महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली आहे.  – विनायक पाटील, राज्यात प्रथम आलेला उमेदवार

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mpsc 2022 result declared vinayak patil first in maharashtra zws
Show comments