पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा-२०२२ या परीक्षेअंतर्गत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. मुख्य परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची नावाची यादी आणि पात्रता गुण (कटऑफ ) एमपीएससीने संकेतस्थळावर जाहीर केले.
एमपीएससीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. ही परीक्षा १ ऑक्टोबर आणि २९ ऑक्टोबर रोजी घेण्यात आली होती. न्यायाधिकरणाच्या निकालाच्या अधीन तृतीयपंथी उमेदवारांचा निकाल राखून ठेऊन मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येत आहे. मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांनी अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे, त्यांची पात्रता तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून, मुख्य परीक्षेच्या निकालाआधारे शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरवण्यात आले आहे. शारीरिक चाचणी आणि मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या, अर्जात प्राविण्यप्राप्त खेळाडूचा दावा केलेल्या उमेदवारांनी त्यांचे क्रीडा प्रमाणपत्र पडताळणीसाठी विभागीय क्रीडा उपसंचालकांकडे पूर्व परीक्षेचा अर्ज स्वीकारण्याच्या २३ जून, २०२२ या अंतिम दिनांकास किंवा तत्पूर्वी सादर केल्याची पोचपावती, त्या दिनांकास किंवा तत्पूर्वीचे संबंधित क्रीडा प्रमाणपत्र आणि सदर क्रीडा विषयक प्रमाणपत्र गट-ब पदासाठी वैध ठरत असल्याबाबतचा संबंधित विभागीय क्रीडा उपसंचालकांचा क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल मुलाखतीच्या वेळेस सादर करणे अनिवार्य राहील.
हेही वाचा…सरकारी नोकऱ्यांमध्ये ५० टक्के आरक्षण, गरीब महिलांना दरवर्षी एक लाख रुपये… राहुल गांधी यांची हमी
मुख्य परीक्षेसाठी अर्जाद्वारे सादर केलेले दावे पात्रतेच्या आधारेच निवडीसाठी आजमावण्यात येईल. आवश्यक तपासणीनुसार अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल. शारीरिक चाचणी आणि मुलाखत कार्यक्रमबाबत स्वतंत्रपणे माहिती देण्यात येईल. शारीरिक चाचणी डिजिटल प्रणालीद्वारे घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.