पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२१ या परीक्षेतील पोलिस उपनिरीक्षक या संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. अनाथ आरक्षणासंदर्भात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने दिलेल्या आदेशानुसार अनाथ दोन पदे या जाहिरातीमध्ये समाविष्ट करून ३७८ पदांसाठीही सर्वसाधारण गुणवत्ता यादी आहे.
एमपीएससीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. ही गुणवत्ता यादी निव्वळ तात्पुरत्या स्वरुपाची असून, विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी पडताळणीअंती काही उमेदवारांच्या दाव्यांमध्ये, शिफारसींमध्ये बदल होऊ शकतो. खेळाडू प्रवर्गातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची क्रीडाविषयक प्रमाणपत्रे प्राधिकृत क्रीडा अधिकाऱ्यांनी तपासणाच्या अटीच्या अधीन राहून त्यांचा खेळाडू प्रवर्गाचा दावा तात्पुरता ग्राह्य धरून त्यांचा समावेश तात्पुरत्या गुणवत्ता यादीमध्ये करण्यात आला आहे, असे एमपीएससीकडून नमूद करण्यात आले.
जवळपास दोन वर्षांहून अधिक काळ तांत्रिक या परीक्षेचा निकाल रखडला होता. या परीक्षेच्या निकालाकडे उमेदवारांचे लक्ष लागले होते. न्यायिक प्रकरणांमुळे निकाल रखडल्याने उमेदवारांना प्रतीक्षा करावी लागत होती. अखेर एमपीएससीने या निकाल जाहीर केल्याने या प्रक्रियेत सहभागी उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.