पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) संयुक्त पूर्व परीक्षेत (२०२४) कृषी सेवेच्या पदांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कृषी सेवेतील २५८ पदे ही राज्यसेवेच्या परीक्षेत समाविष्ट झाली असून, उमेदवारांना १७ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेत कृषी सेवेतील २५८ पदांच्या भरती प्रक्रिया राबवण्याची, या पदांचा समावेश संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये करण्याची स्पर्धा परीक्षार्थ्यांची मागणी होती. त्या बाबतची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंतीही करण्यात आली होती. मात्र मागणी मान्य होत नसल्याने स्पर्धा परीक्षार्थ्यांनी पुण्यात आंदोलन केले. या आंदोलनामुळे राज्य शासनाने नियोजित संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती एमपीएससीला केली. त्यानंतर एमपीएससीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत कृषी सेवेतील २५८ पदांचा समावेश संयुक्त पूर्व परीक्षेत करण्याचा निर्णय घेण्यात आला. संयुक्त पूर्व परीक्षा १ डिसेंबर रोजी होणार आहे.

हे ही वाचा…राज्यातील तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा… कधी, कोणत्या विषयांची होणार परीक्षा?

कृषी सेवेतील २५८ पदांमध्ये कृषी उपसंचालक पदाच्या ४८, तालुका कृषी अधिकारी तथा तंत्र अधिकारी पदाच्या ५३, कृषी अधिकारी, कनिष्ठ व पदांच्या १५७ अशा एकूण २५८ पदांचा समावेश आहे. या पदांच्या परीक्षेसाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आरक्षण यांचा तपशील एमपीएससीने जाहीर केला आहे. खुल्या गटासाठी कमाल वयोमर्यादा ३८, मागासवर्गीय गटासाठी ४३, माजी सैनिक गटासाठी ४३ आणि दिव्यांग गटातील उमेदवारांसाठी ४५ इतकी वयोमर्यादा आहे. पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेस बसलेले उमेदवार देखील पूर्व परीक्षेसाठी पात्र असतील. परंतु, मुख्य परीक्षेच्या प्रवेशाकरिता अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.

हे ही वाचा…महाविद्यालयाच्या आवारात अत्याचार प्रकरणी संस्थाचालकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी – MVA कडून आयुक्तालयासमोर आंदोलन

ज्या उमेदवारांनी यापूर्वी अर्ज केलेला नाही. परंतु, ते परीक्षेचे निकष पूर्ण करत आहेत, अशा उमेदवारांना नव्याने अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. नव्याने अर्ज करणाऱ्या पात्र उमेदवारांना फक्त महाराष्ट्र कृषी सेवेसाठी अर्ज करता येईल. या पूर्वी अर्ज सादर केलेल्या, तसेच शैक्षणिक पात्रतेनुसार कृषी सेवेसाठी पात्र ठरणाऱ्या पात्रताधारक उमेदवारांना कृषी सेवेचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नव्याने अर्ज करणाऱ्या उमेदवारांना फक्त अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, मुंबई व पुणे जिल्हा केंद्रावरील परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यात येईल. परीक्षेच्या दिवशी अन्य संस्थेची परीक्षा असल्यास उमेदवारांना कोणती परीक्षा द्यावयाची आहे, याबाबतचा निर्णय उमेदवाराने स्वत: घेणे आवश्यक राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.