महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा आणि केंद्रीय आयोगाच्या किंवा विद्यापीठांच्या परीक्षा एकत्र येण्याचे प्रकार नेहमीचेच झाले आहेत. मात्र, या वेळी आयोगाच्याच दोन परीक्षा आणि महसूल विभागाकडून जिल्हा स्तरावर घेण्यात येणारी तलाठी पदाची परीक्षा एकत्र येत आहे.
राज्यसेवा मुख्य परीक्षा १२ ते १४ सप्टेंबर या कालावधीत होणार आहे, त्याचवेळी आयोगाकडूनच घेण्यात येणारी महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षाही घेण्यात येत असल्याचे आयोगाच्या वेळापत्रकाप्रमाणे दिसत आहे. मुळातच गेल्या काही वर्षांमघ्ये अभियांत्रिकी शाखेतील पदवी घेऊन राज्यसेवा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची संख्या वाढली आहे. हेच विद्यार्थी अभियांत्रिकी परीक्षेसाठीही पात्र ठरत आहेत. त्याचवेळी १३ सप्टेंबरला राज्यभरात तलाठी पदासाठी जिल्हास्तरावर महसूल विभागाकडून परीक्षा घेण्यात येत आहे. त्यामुळे या परीक्षा देणारे उमेदवार अडचणीत आले असल्याची माहिती उमेदवारांकडून देण्यात आली. इतर संस्थांच्या आणि विद्यापीठांच्या परीक्षांशी आयोगाच्या वेळापत्रकाचा ताळमेळ जमत नसल्याच्या घटना यापूर्वीही झाल्या आहेत. मात्र, आयोगाच्याच आणि मंत्रालयाकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे उमेदवारांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा