महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०१४ च्या राज्यसेवा परीक्षेत अभियांत्रिकी आणि वैद्यकीय पदवीधर उमेदवारांनी ठसा उमटवला आहे. या वर्षी ग्रामीण भागातील उमेदवारांनी या परीक्षेत बाजी मारली असून सोलापूर येथील अभयसिंह मोहिते राज्यात सर्वप्रथम आला आहे. तर नांदेड येथील वनश्री लाभशेटवार (गुण ४२५) ही राज्यात मुलींमध्ये पहिली आली असून ती वैद्यकीय पदवीधर आहे.
राज्यसेवा परीक्षेचा निकाल रविवारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत सोलापूर जिल्ह्य़ातील कचरेवाडी-मंगळवेढे येथील अभयसिंह मोहिते ४७० गुण मिळवून राज्यात पहिला आला आहे. समाधान शेंडगे (गुण ४६६) हा विद्यार्थी दुसरा, तर प्रशांत खेडेकर (गुण ४६३) हा विद्यार्थी तिसरा आला आहे. पुण्यातील विशाल साकोरे (गुण ४६३) हा उमेदवार मागासवर्गीय गटात पहिला, तर एकुणात चौथा आला आहे. हे दोघेही उमेदवार अभियांत्रिकी शाखेचे पदवीधर आहेत.
उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, तहसीलदार अशा महत्त्वाच्या पदांसाठी ही परीक्षा झाली होती. ‘अ’ वर्गातील १२५ आणि ‘ब’ वर्गातील ३१३ अशा एकूण ४३८ पदांसाठी ही परीक्षा झाली होती. या परीक्षेसाठी राज्यातून १ लाख ७६ हजार २२४ उमेदवारांनी नोंदणी केली होती. परीक्षेसाठी महत्त्वाची पदे असल्यामुळे आणि पदांची संख्या जास्त असल्यामुळे या वेळी उमेदवारांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. या वर्षी निवडल्या गेलेल्या ४३८ उमेदवारांपैकी १३६ उमेदवार हे अभियांत्रिकी शाखेतील पदवीधर आहेत, तर ८४ उमेदवार हे वैद्यकीय शाखेतील पदवीधर आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा