नैराश्यातून आत्महत्या केल्याचे निष्पन्न
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरही नोकरी न मिळाल्याने एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. युवकाने नैराश्यातून आत्महत्या केल्याची माहिती प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाली आहे.
स्वप्नील सुनील लोणक र (वय २४, रा. गंगानगर, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. स्वप्नील २०१९ च्या एमपीएससीच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाला होता. गेले दीड वर्ष त्याची मुलाखत झाली नव्हती. त्यानंतर त्याने पुन्हा परीक्षा दिली होती. या पूर्व परीक्षेत तो उत्तीर्ण झाला होता. करोनाच्या संसर्गामुळे मुख्य परीक्षा झाली नव्हती. त्यामुळे तो नैराश्यात होता. बुधवारी (३० जून) सकाळी त्याचे आई-वडील कामानिमित्त बाहेर पडले. त्यानंतर त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दुपारी उघडकीस आले.
स्वप्नील गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात होता. त्याने नैराश्यातून आत्महत्या केल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली. त्याच्या वडिलांचा शनिवार पेठेत मुद्रण व्यवसाय आहे.
याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी स्वप्नीलने लिहिलेली चिठ्ठी सापडली असून तणावामुळे आत्महत्या केल्याचे त्याने चिठ्ठीत लिहिले आहे, असे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र ढावरे यांनी सांगितले.