महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सूचना देऊनही राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये प्रवेशपत्रांचा गोंधळ झाल्यामुळे अनेक उमेदवारांना परीक्षा केंद्रावर जाण्यास उशीर झाला, तर काही उमेदवारांना परीक्षा देण्याची संधी गमवावी लागली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा पूर्व परीक्षा शनिवारी झाली. काही केंद्रांचे अपवाद वगळता बहुतेक ठिकाणी परीक्षा सुरळीत झाली.
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या प्रवेशपत्रांबाबत काही अडचणी असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वारंवार करूनही प्रत्यक्ष परीक्षेच्या दिवशी मात्र परीक्षा केंद्रांवर थोडे गोंधळाचे वातावरण होते. परीक्षेच्या आदल्या दिवशीपर्यंत केंद्र बदलत असल्यामुळे उमेदवारांचा परीक्षेच्या दिवशी गोंधळ उडाला. या गोंधळामुळे अनेक उमेदवारांना परीक्षेला उशीर झाला, तर काही उमेदवारांना तर परीक्षेची संधी गमवावी लागली आहे.
पुण्यातील एका केंद्रावर एकच परीक्षा क्रमांक एकापेक्षा अधिक उमेदवारांना देण्यात आल्याचे परीक्षेच्या वेळी लक्षात आले. मात्र, या सर्व उमेदवारांना परीक्षेला बसू देण्यात आले, अशी माहिती उमेदवारांनी दिली. परीक्षा केंद्रांवर असलेल्या यादीमध्ये काही उमेदवारांच्या नावासमोर वेगळ्याच उमेदवाराचे छायाचित्र असल्यामुळे गोंधळ झाल्याचे काही उमेदवारांनी सांगितले. काही उमेदवारांना तर परीक्षेची संधी गमवावी लागली आहे. प्रवेशपत्रातील गोंधळामुळे परीक्षाच देऊ न शकलेल्या उमेदवाराने सांगितले, ‘‘परीक्षेच्या दिवशी सकाळी मी प्रवेशपत्राची प्रिंट आउट घेतल्यानंतर प्रवेशपत्रावर वेगळेच नाव असल्याचे लक्षात आले. प्रवेशपत्रावरील परीक्षा केंद्रावर जाऊन ही बाब पर्यवेक्षकांच्या लक्षात आणून दिली. मात्र, नाव वेगळे असल्यामुळे परीक्षेला बसता येणार नाही, असे त्यांनी सांगितले. पुन्हा एकदा प्रोफाइल उघडून प्रवेशपत्र मिळते का हे पाहिले. मात्र, दुसऱ्या वेळीही दुसऱ्याच नावाचे प्रवेशपत्र मिळाले. ही गोष्ट मी केंद्रावर पर्यवेक्षकांच्या लक्षात आणून दिली. पण तोपर्यंत परीक्षा सुरू झाली होती. त्यामुळे मला परीक्षेला बसू देण्यात आले नाही.’’
या परीक्षेला राज्यातून २ लाख ९७ हजार उमेदवार बसले होते. राज्यात ९८० केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. परीक्षेच्या प्रवेशपत्राबाबत काही अडचणी असल्यास १३ मे पर्यंत आयोगाशी संपर्क साधण्याची सूचना आयोगामार्फत देण्यात आली होती. परीक्षेसंबंधी काही अडचणी असतील, तर संपर्क साधण्यासाठी मदत क्रमांकही शुक्रवारी देण्यात आले होते. मात्र, तरीही परीक्षेच्या वेळी काही केंद्रांवर गोंधळ उडाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा