पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) २५ ऑगस्टला होणाऱ्या परीक्षेत कृषी विभागाच्या २५८ पदांचा समावेश करण्याची मागणी करत स्पर्धा परीक्षार्थींनी मंगळवारी रात्री सुरू केलेले ठिय्या आंदोलन बुधवारीही सुरू ठेवले. खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससीच्या अध्यक्षांना या बाबत सकरात्मक निर्णय घेण्याची विनंती केली आहे. त्यानंतर आता आज (२२ ऑगस्ट) सकाळी दहा वाजता एमपीएससीची बैठक झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एमपीएससीतर्फे राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा २५ ऑगस्ट रोजी होत आहे. कृषी सेवेतील २५८ पदांचा समावेश याच परीक्षेत करण्याची स्पर्धा परीक्षार्थींची मागणी आहे. मात्र या परीक्षेसंदर्भात २९ डिसेंबर, २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध होईपर्यंत एमपीएससीकडे महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा २०२४ साठीचे मागणीपत्र शासनाकडून प्राप्त झाले नाही. त्यामुळे कृषी सेवेतील पदांचा समावेश जाहिरातीमध्ये करणे शक्य झाले नाही. आता या परीक्षेची तयारी झाली असून, कृषी सेवेच्या मागणीपत्रातील पदांच्या भरती प्रक्रियेबाबत पुढील नियोजन लवकरात लवकर करण्यात येईल, असे परिपत्रक एमपीएससीने मंगळवारी प्रसिद्ध केले.

हे ही वाचा… Maharashtra Breaking News Live : पुण्यात MPSC च्या विद्यार्थ्यांचं आंदोलन

या पार्श्वभूमीवर स्पर्धा परीक्षार्थींनी आक्रमक भूमिका घेत मंगळवारी रात्रीपासून शास्त्री रस्ता येथे ठिय्या आंदोलन सुरू केले. खासदार सुप्रिया सुळे यांनी या आंदोलकांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला. दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे दोन्ही परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना एका परीक्षेला मुकावे लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थी विविध माध्यमांतून शासनाकडे पाठपुरावा करत आहेत. शासनाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. महाराष्ट्र कृषी सेवा गट अ, ब आणि ब (कनिष्ठ) संवर्गासाठीची परीक्षा ऑक्टोबरमध्ये घेण्यात येणार असल्यास ही पदे राज्यसेवा परीक्षेमध्ये समाविष्ट करून ऑक्टोबरमध्ये एकत्रित सर्वसमावेशक राज्यसेवा परीक्षा घेणे शक्य आहे आणि तांत्रिकदृष्ट्या तेच योग्य आहे, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. विद्यार्थ्यांच्या रास्त मागण्यांची दखल घेऊन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला योग्य ते निर्देश देऊन तातडीने परिपत्रक जाहीर करण्याची मागणी सुळे यांनी केली.

या आंदोलनाची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली.आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षा २५ ऑगस्ट रोजी होत आहेत. तसेच कृषी विभागाच्या २५८ जागांचा समावेश राज्य सेवा पूर्व परीक्षेत झालेला नाही. या दोन्ही कारणांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना केल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजमाध्यमांद्वारे दिली.

हे ही वाचा… पुणे : लक्ष्मी रस्त्यावर तरुणाला लुटणारे चोरटे गजाआड

शरद पवार यांचा सरकारला इशारा

स्पर्धा परीक्षार्थ्यांच्या आंदोलनाला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही पाठिंबा देत सरकारला इशारा दिला होता. सरकारने स्पर्धा परीक्षार्थ्यांच्या मागण्यांची दखल न घेतल्यास आंदोनलात उतरणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले होते.

बैठकीत निर्णय काय?

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) आज बैठक झाली. त्यात रविवारी (२५ ऑगस्ट) नियोजित असलेली महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षेचा सुधारित दिनांक लवकरात लवकर जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती आयोगाने दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mpsc examination gazetted civil services joint prelims on 25th august postponed pune print news ccp 14 asj