पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) रविवारी (२ फेब्रुवारी) घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट ब संयुक्त पूर्व परीक्षेची प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देतो, असे सांगून ४० लाखांची मागणी करणारी ध्वनिफीत नुकतीच प्रसारित झाली होती. या घटनेची गंभीर दखल घेऊन पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने चाकणमधून दोघांना अटक केली. त्यांच्या एका साथीदाराला नागपूरमधून ताब्यात घेण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी याबाबतची ध्वनिफीत समाजमाध्यमात प्रसारित झाल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. दीपक दयाराम गायधने (वय २६ वर्षे, चाकण, मूळ. रा. तुमसर जि. भंडारा), सुमित कैलास जाधव (वय २३, चाकण, मुळ रा. नांदगाव, जि.नाशिक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचा साथीदार योगेश सुरेंद्र वाघमारे (रा. सोनाली ता. वराठी, जि. भंडारा) याला नागपूर पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत एमपीएससीच्या सचिव सुवर्णा खरात यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
रविवारी एमपीएससी गट ब (अराजपत्रीत) संयुक्त पूर्व परीक्षा आहे. दोन दिवसांपूर्वीच परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिकेसह दिली जाईल. त्यासाठी ४० लाख रुपये द्यावे लागतील,अशी ध्वनिफीत प्रसारित झाली होते. पुण्यातील एका विद्यार्थ्याच्या मोबाइलवर याबाबतच संपर्क साधण्यात आला होता. तसेच, एमपीएससीकडेदेखील अनेक विद्यार्थ्यांनी ईमेलद्वारे तक्रारी केल्या होत्या. या सर्व पार्श्वभूमीवर एमपीएससीकडून पुणे पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला.
तांत्रिक तपास करून पोलिसांनी गायधने आणि जाधव या दोघांना चाकण येथून ताब्यात घेतले. तपासात त्यांनी काही विद्यार्थ्यांच्या मोबाइलवर त्यांनी संपर्क साधल्याचे कबूल केले. त्यानंतर दोघांना अटक करण्यात आली. दोघेही चाकण येथील एका कंपनीत कामाला आहेत. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत वाघमारेची माहिती मिळाली. वाघमारे याने नाशिक येथील २४ उमेदवारांची यादी दोन आरोपींना दिली होती. त्या यादीतील नाशिक जिल्ह्यातील नांदगावमधील दोन विद्यार्थ्यांच्या मोबाइलवर संपर्क साधण्यात आला होता. त्यानंतर पुणे पोलिसांनी नागपूर पोलिसांच्या मदतीने वाघमारेला ताब्यात घेतले आहे.
आणखी काहींना अटक होण्याची शक्यता
आरोपींनी एमपीएससी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची माहिती, मोबाइल क्रमांक मिळविले. मात्र, ध्वनिफीत प्रसारित झाल्याने हे प्रकरण उघडकीस आले. आरोपींनी नेमके किती जणांना दूरध्वनी केले, त्यासाठी त्यांना अन्य कोणी मदत केली का, याबाबत पोलीस तपास करत असून, या प्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.
पोलिसांचे आवाहन
रविवारी होणाऱ्या परीक्षेचा प्रश्नपत्रिका फुटल्याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी काळजी न करता परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे. चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर एमपीएससीकडून तत्काळ तक्रार देण्यात आली. त्यानुसार गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे. एकाला नागपूरहून ताब्यात घेण्यात आले आहे. प्राथमिक तपासात प्रश्नपत्रिका फुटल्याचे दिसले नाही. आरोपींची चौकशी केल्यानंतर अधिक माहिती समोर येईल. यामध्ये आणखी कोणी आहे का? तसेच, परीक्षेपूर्वी गोंधळ निर्माण करण्याचा कोणाचा हेतू होता का ? या दृष्टिने तपास करण्यात येत आहे.निखिल पिंगळे, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा