पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२२ या परीक्षेअंतर्गत दुय्यम निबंधक श्रेणी १-मुद्रांक निरीक्षक या संवर्गातील ७८ पदांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेची तात्पुरती निवड यादी जाहीर करण्यात आली. त्यात विश्वजित पाटील यांनी खुल्या गटातून राज्यात प्रथम क्रमांक मिळवला.
एमपीएससीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. जाहीर करण्यात आलेली निवडयादी तात्पुरत्या स्वरुपाची असल्याने उमेदवारांच्या अर्जांतील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी काही उमेदवारांच्या शिफारसीमध्ये बदल होऊ शकतो. ही निवडयादी न्यायालयाच्या, न्यायाधिकरणात दाखल विविध न्यायिक प्रकरणांतील न्यायनिर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात आली आहे.
खेळाडू प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांची क्रीडाविषयक प्रमाणपत्रे प्राधिकृत क्रीडा अधिकारी यांनी तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून त्यांचा खेळाडू प्रवर्गाचा दावा तात्पुरता ग्राह्य धरण्यात आला आहे. भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (ऑप्टिंग आऊट) पर्याय सादर करण्यासाठी उमेदवारांना २२ ते २८ डिसेंबरची मुदत देण्यात आली आहे. भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय केवळ ऑनलाइन पद्धतीनेच सादर करता येईल. या पर्यायाच्या आधारेच अंतिम शिफारशीसंदर्भात कार्यवाही करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.