महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विक्रीकर निरीक्षक पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षाच्या अंतिम उत्तरतालिकेतही चुका असल्याची तक्रार उमेदवारांनी केली आहे. आयोगाने अंतिम उत्तरतालिकेचा पुनर्विचार करावा, अशी मागणी उमेदवारांकडून करण्यात येत आहे.
आयोगाकडून विक्रीकर निरीक्षक पदासाठी १८ ऑगस्टला मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेची अंतिम उत्तरतालिका नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. प्राथमिक उत्तरतालिका जाहीर करून त्यावर आलेल्या आक्षेपांचा विचार करून अंतिम उत्तरतालिका जाहीर करण्यात आली. अंतिम उत्तरतालिकेनुसार आयोगाने ९ प्रश्न रद्द केले आहेत, तर ८ प्रश्नांची उत्तरे बदलली आहेत. मात्र तरीही या उत्तरतालिकेत काही प्रश्नांची उत्तरे चुकीची दाखवण्यात आली असल्याचा आक्षेप उमेदवारांनी घेतला आहे.
या परीक्षेच्या पहिल्या भागांतील प्रश्नपत्रिकेच्या ‘ब’ संचातील प्रश्न क्रमांक ५ व १८ याबाबत उमेदवारांनी आक्षेप घेतले आहेत. त्याचप्रमाणे दुसऱ्या भागांतील ‘ब’ संचातील प्रश्नक्रमांक ५९ व ६६ या प्रश्नांच्या उत्तरावर उमेदवारांचे आक्षेप आहेत. या आक्षेपांबाबत आयोगाकडेही तक्रार करण्यात आल्याचे उमेदवारांनी सांगितले. आयोगाकडून अंतिम उत्तरतालिकेवर आक्षेप स्वीकारण्यात येत नाहीत. मात्र यामुळे उमेदवारांचे नुकसान होऊ शकते असे उमेदवारांचे म्हणणे आहे.