पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) पुढे ढकलण्यात आलेली महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ही परीक्षा आता १ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात येणार आहे. कृषी सेवेच्या २५८ पदांचा समावेश याच परीक्षेत करण्यात येणार असून, उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी २१ दिवसांची मुदत दिली जाणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एमपीएससीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे या बाबतची माहिती दिली. एमपीएससीतर्फे महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ या परीक्षेचे आयोजन २५ ऑगस्टला करण्यात आले होते. मात्र, त्याच दिवशी आयबीपीएसचीही परीक्षा होती. त्यामुळे दोन स्पर्धा परीक्षा एकाच दिवशी नको, याच परीक्षेत कृषी सेवेच्या २५८ पदांचा समावेश करण्यासाठी स्पर्धा परीक्षार्थ्यांनी पुण्यात आंदोलन केले होते. या आंदोलनाला राजकीय वळण लागले होते. त्यामुळे राज्य शासनाने ही परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती एमपीएससीला केली होती. त्यानंतर एमपीएससीकडून संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ कधी आयोजित केली जाणार या कडे उमेदवारांचे लक्ष लागले होते.

हेही वाचा >>> केंद्र सरकारवर दहा वर्षांत भ्रष्टाचाराचा एकही डाग नाही… केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचे पुण्यात विधान

एमपीएससीने दिलेल्या माहितीनुसार २९ डिसेंबर, २०२३ रोजी विविध संवर्गाच्या एकूण २७४ रिक्त पदांकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरीता आरक्षित पदसंख्या नमूद करून एकूण ५२४ पदांचे शुद्धिपत्रक ८ मे २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आले. ही जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर कृषि विभागाने १६ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र कृषी सेवा २०२४साठीच्या २५८ पदांचे मागणीपत्र आयोगाला दिले. या पदांचा समावेश महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२४मध्ये करण्याबाबत शासनाकडून विनंती करण्यात आली होती. या अनुषंगाने आयोगाची २३ सप्टेंबर, २०२४ रोजी बैठक झाली. महाराष्ट्र कृषि सेवेतील पदांचा समावेश महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ मध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा >>> वक्फ सुधारणांबाबत केंद्रीय मंत्र्याचे भाष्य; म्हणाले, “अपप्रचार नको…”

कृषि सेवेतील पदांचा तपशील आणि शैक्षणिक पात्रतेनुसार अर्ज सादर करण्याबाबतचे शुद्धिपत्रक लवकरच आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी २१ दिवसांचा कालावधी देण्यात येईल. अर्ज कालावधी, नव्याने अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संख्या विचारात घेऊन प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका छपाईचा कालावधी, ऑक्टोबरमध्येमध्ये आयोजित इतर संस्थेच्या भरतीप्रक्रिये संदर्भात विविध परीक्षांचे वेळापत्रक, आगामी विधानसभा निवडणुकीची आचार संहिता व निवडणुकीचा अंदाजित कार्यक्रम इत्यादी बाबी विचारात घेऊन महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ही परीक्षा १ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात येणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mpsc preliminary exam 2024 to be held on 1st december pune print news ccp 14 zws