लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) २७ एप्रिल रोजी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ घेण्यात येणार आहे. ही परीक्षा राज्यभरातील ३७ जिल्हा केंद्रांवर घेतली जाणार असून, या परीक्षेसाठी ५ ते २५ जानेवारी या कालावधीत अर्ज करता येणार आहे.
एमपीएससीने याबाबत माहिती दिली. महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४च्या माध्यमातून विविध संवर्गातील एकूण २७४ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्या अंतर्गत सामान्य प्रशासन विभागातील राज्यसेवा संवर्गातील २०५, मृद आणि जलसंधारण विभागातील महाराष्ट्र स्थापत्य सेवा अभियांत्रिकी सेवा संवर्गातील २६, महसूल आणि वन विभागातील महाराष्ट्र वनसेवा संवर्गातील ४३ पदांचा समावेश आहे. या पदांसाठी अर्ज करून ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्यासाठी २५ जानेवारी ही अंतिम मुदत आहे. तर २९ जानेवारीपर्यंत चलनाद्वारे शुल्क भरता येणार आहे.
आणखी वाचा-वित्त विभागाच्या निर्णयामुळे विद्यापीठांमधील पदभरती होणार सुलभ… काय आहे निर्णय?
पूर्व परीक्षेतून पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी १४ ते १६ डिसेंबर या कालावधीत राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२४ , २३ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र स्थापत्य सेवा अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२४, तर महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा २८ ते ३१ डिसेंबर या कालावधीत होणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
पदसंख्या आणि आरक्षणामध्ये बदल झाल्यास त्याचा समावेश मुख्य परीक्षेच्या अधिसूचनेमध्ये करण्यात येईल. पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत शासनाकडून सुधारित किंवा अतिरिक्त मागणीपत्राद्वारे प्राप्त होणारी सर्व पदे पूर्व परीक्षेच्या निकालासाठी विचारा घेतली जाणार असल्याची माहिती एमपीएससीने दिली.