‘अजित पवार हे शब्दाला पक्का असलेला माणूस आहेत; त्यांनी आता शब्द पाळायला हवा होता, असा नाराजीचा सूर लावत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला आहे. चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना आपली नाराजी बोलून दाखवली. शब्दाला पक्का असणारा अजित पवारांसारखा माणूस नाही, असं मी अनेक वेळा म्हणालो; पण त्यांनीच शब्द फिरवणं म्हणजे आश्चर्य आहे, अशी टीका पाटील यांनी केली. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (रविवारी) एक भूमिका मांडली. ती म्हणजे पूरग्रस्तांसाठी मदतीबाबत… पॅकेज आणि मदत यामध्ये फरक काय? पॅकेज हा इंग्लिश शब्द आहे. पण मदत तर करा”, असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याच्या नियुक्त्यांबाबत ३१ जुलैपर्यंत निर्णय घेतला जाईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात सांगितलं होतं, पण आता मुदत उलटून गेली आहे. त्यामुळे विद्यार्थी आक्रमक होत आहे, याकडे चंद्रकात पाटील यांचं लक्ष वेधण्यात आलं. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, “मी आजवर अनेक वेळा म्हटलं की, अजित पवार सकाळी सात वाजल्यापासून कामाला सुरुवात करतात. अजित पवारांसारखा शब्दाला पक्का माणूस नाही. पण आता शब्द पाळायला हवा होता, मात्र त्यांनी शब्द फिरवणं म्हणजे आश्चर्य आहे”, असं पाटील म्हणाले.

मनसेसोबत युती करण्यावरुन चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान; म्हणाले…

“खोटं बोलणारं सरकार म्हणजे महाविकास आघाडी सरकार असून, काहीही झालं की, वेळ मारून न्यायची एवढच यांचं काम आहे. घोषणा करायची, मात्र काही अंमलबजावणी करायची नाही; याबाबत उत्तम उदाहरण म्हणजे स्पर्धा परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्याच्याबाबत विधानसभेत करण्यात आलेली घोषणा. शब्द दिला पण तो शब्द पाळला नाही. प्रत्येक विषयावर थापा मारणार का?”, असा संतप्त सवाल पाटील यांनी केला.

पॅकेज आणि मदतमध्ये फरक काय : चंद्रकांत पाटील

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सांगली दौर्‍यावर आहेत. त्याबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल एक भूमिका मांडली, ती म्हणजे पूरग्रस्तांसाठी मदतीबाबत… पॅकेज आणि मदत यामध्ये फरक काय? पॅकेज हा इंग्लिश शब्द आहे. पण मदत तर करा; पण काही होताना दिसत नाही. पूरग्रस्तांसाठी तात्काळ मदत करायला पाहिजे. मात्र हे अनेक अटी लावताना दिसत आहे. पासबुक, चेकबुक वाहून गेले आहेत. त्यांच्या खात्यावर तात्काळ पैसे जमा करून स्लिप भरताच पैसे मिळाले पाहिजे”, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

Story img Loader