पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) लिपिक टंकलेखक, कर सहायक या टंकलेखन आवश्यक असलेल्या पदांच्या परीक्षांसाठी नवी कार्यपद्धती जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार लिपिक टंकलेखक पदाच्या भरतीमध्ये मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांना मराठी किंवा इंग्रजी यापैकी एक टंकलेखन कौशल्य चाचणी निवडता येणार असून, कर सहायक पदासाठी दोन्ही भाषांतील टंकलेखन कौशल्य चाचण्या द्याव्या लागणार आहेत. दोन्ही पदांसाठी टंकलेखन कौशल्य चाचणी अर्हताकारी स्वरुपाची करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> पिंपरी, मावळवर भाजपचा दावा; प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश

एमपीएससीने या संदर्भातील माहिती परिपत्रकाद्वारे दिली.  लिपिक टंकलेखक, कर सहायक या पदांच्या सेवा प्रवेश नियमांतील तरतुदी आणि अन्य बाबींचा साकल्याने विचार करून कार्यपद्धती जाहीर करण्यात आली. त्यानुसार लिपिक टंकलेखक, कर सहायक पदासाठीच्या पदभरतीमध्ये संगणक प्रणालीवर आधारित टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्यात येणार आहे. लेखी परीक्षेच्या आधारे संबंधित पदांसाठी भरल्या जाणाऱ्या पदांच्या तीन पट उमेदवार टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी पात्र ठरवले जातील. ही कार्यपद्धत या पुढे होणाऱ्या टंकलेखन कौशल्य चाचणीला लागू असेल, असे स्पष्ट करण्यात आले.

हेही वाचा >>> यंदाचा साखर हंगाम कधी सुरू होणार? मंत्री समिती बैठकीला मुहूर्त मिळेना

अपंग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांना नियुक्ती मिळाल्यास टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षांचा कालावधी आणि दोन संधी लागू असल्याने या वर्गातून आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांना टंकलेखन चाचणी अनिवार्य नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे. 

चाचणीचे स्वरूप

इंग्रजी भाषेतील टंकलेखनासाठी दहा मिनिटांच्या ४० शब्द प्रति मिनिट वेगाने १२ हजार की डिप्रेशन, तर मराठीसाठी दहा मिनिटांच्या ३० शब्द प्रति मिनिट वेगाने ९ हजार की डिप्रेशन असे चाचणीचे स्वरूप असेल. मराठीसाठी १५०० की डिप्रेशन्स, इंग्रजीसाठी दोन हजार की डिप्रेशन्स नुसार तयार होणाऱ्या शब्दांच्या शेकडा प्रमाणानुसार चुका मोजल्या जातील. अराखीव गटासाठी ७ टक्के, तर मागास, आर्थिक दुर्बल गटासाठी १० टक्के अशी पात्रतेसाठी सीमांकन मर्यादा असेल, असे एमपीएससीने स्पष्ट केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mpsc start new procedure for typing skill test pune print news ccp 14 zws