मागील ३६ तासांपासून पुण्यात एमपीएससी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी आंदोलन करत आहेत. आपल्या विविध मागण्यांसाठी हे विद्यार्थी उपोषणाला बसले आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आंदोलनस्थळी जाऊन आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेतली आहे.
येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर बैठक घेऊ. या बैठकीला मीही उपस्थित राहीन, असं आश्वासन शरद पवार यांनी दिलं. आंदोलनस्थळी येताना आपली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून चर्चा झाली. त्यानंतर येत्या दोन दिवसांत यावर चर्चा करू असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, अशी माहिती शरद पवार यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना दिली.
तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर होणाऱ्या संबंधित बैठकीला कोण-कोण हजर राहणार? अशा पाच विद्यार्थ्यांची नावंही आपल्याला कळवावीत. या पाच विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ घेऊन मी या बैठकीला जाईल, असं आश्वासन शरद पवारांनी दिलं.
दरम्यान, त्यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांसमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन लावला. यावेळी मुख्यमंत्र्यांनीही विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिलं. शरद पवारांच्या मध्यस्थीनंतर एमपीएससी विद्यार्थ्यांनी उपोषण स्थगित केले आहे. मात्र आंदोलन सुरूच राहणार आहे. जोपर्यंत नोटीफिकेशन निघत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्यावर विद्यार्थी ठाम आहेत. शरद पवारांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यांशी फोनवरून तीन मिनिटं चर्चा केली. एमपीएससीचे पाच विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ आणि शरद पवार यांच्यासमवेत बैठक घेऊन येत्या दोन दिवसात विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याच आश्वसन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे.