पुणे : केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार घोषित करण्यात आले. त्यात पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षिका मृणाल गांजाळे या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या असून, यंदा राज्यातील एकाच शिक्षकाला हा पुरस्कार मिळाला आहे.
शिक्षण क्षेत्रात प्रयोगशील काम करणाऱ्या शिक्षकांना केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून दरवर्षी राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात येते. पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक दिनी पुरस्कार प्रदान करण्यात येते. यंदा मंत्रालयाकडून देशभरातील ५० शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.
हेही वाचा – पुणे : कांदा, टोमॅटोसह बहुतांश फळभाज्यांच्या दरात घट, आवक वाढल्याने फळभाज्या स्वस्त
पाच सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथील विज्ञान भवनमध्ये पुरस्कार प्रदान कार्यक्रम होणार आहे. मृणाल गांजाळे या पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव महाळुंगे जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेतील शिक्षिका आहेत. गेली काही वर्षे राज्यातील किमान दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळत होता. मात्र यंदा राज्यातील एकमेव शिक्षकाचा राष्ट्रीय स्तरावर गौरव झाला आहे.