गेला महिनाभर पालक आणि विद्यार्थ्यांची उत्सुकता ताणून आता अखेरीस परीक्षा परिषद चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर करणार आहे. गुरुवारी (२४ जुलै) दुपारी ही यादी जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती परिषदेचे संचालक व्ही. बी. पायमल यांनी दिली.
चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. परीक्षेचा तात्पुरता निकाल ९ जूनला जाहीर करण्यात आला होता. या वर्षी प्रथमच परिषदेने तात्पुरता निकाल जाहीर करून पालकांकडून आक्षेप मागवले. सर्व आक्षेपांची छाननी करून आता अंतिम निकाल आणि गुणवत्ता यादी २४ जुलैला परिषदेकडून जाहीर करण्यात येणार आहे. परिषदेच्या संकेतस्थळावर दुपारी ३ वाजता निकाल जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा जिल्हावार गुणवत्ता क्रमांक, शिष्यवृत्तीला पात्र किंवा अपात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची यादी, कट ऑफ पाहता येणार आहेत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार त्यांना उत्तरपत्रिकेची छायाप्रतही देण्यात येणार आहे.
या वर्षी राज्यातून चौथीच्या परीक्षेसाठी ८ लाख ९० हजार ७७५ विद्यार्थी, तर सातवीच्या परीक्षेसाठी ६ लाख ७७ हजार ९४१ विद्यार्थी बसले होते. विद्यार्थ्यांना परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा