अकोला ते औरंगाबाद या उच्चदाबाच्या वीजवाहिनीच्या क्षमतावाढीचे काम अखेर पूर्ण झाल्याने शहरातील वीजकपातीबाबत असलेली टांगती तलवार दूर झाली आहे. रविवारीही दिवसभर वाहिनीचे काम सुरू होते. मात्र, रविवारी शहरात वीजकपात झाली नाही.
वीजवाहिनीच्या क्षमतावाढीचे काम २५ एप्रिलला सुरू करण्यात आले. या वाहिनीवरून एक हजार मेगावॉटचा वीजपुरवठा होत असल्याने पुण्यासह राज्याच्या विविध भागामध्ये वीजकपात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. २५ एप्रिलला हे काम सुरू झाले. त्या दिवशी पुण्यातील वीजकपात टळली. मात्र, दुसऱ्या दिवशी शहरातील ‘ब’ गटात मोडणाऱ्या वाहिन्यांवर सुमारे दोन तासांची वीजकपात करण्यात आली. शहरातील तापमान चाळीसच्या पुढे गेल्यामुळे उकाडय़ाने नागरिक हैराण झाले आहेत. अशा परिस्थितीत वीजकपात झाल्याने संताप व्यक्त करण्यात येत होता.
वाहिनीच्या क्षमतावाढीचे काम पूर्ण झाल्याने आता वीजकपातीतून दिलासा मिळाला आहे. या वाहिनीच्या कामासाठी मोठय़ा प्रमाणावर मनुष्यबळ लावून सुमारे सात दिवसांचे काम तीन दिवसांत पूर्ण करण्यात आले. संध्याकाळी वाहिनीचे काम पूर्ण झाले. रात्री उशिरा वाहिनीची चाचणी घेण्याचे काम सुरू होते. हे काम पूर्ण झाल्यानंतर या वाहिनीची विजेच्या वहनाची क्षमता दोन हजार मेगावॉट होणार आहे.

Story img Loader