उकाडा वाढू लागल्याने विजेच्या वापरातही वाढ झाल्याचे दिसून येत असून, सोमवारी राज्यामध्ये सर्वाधिक वीज मागणी नोंदविली गेली. मागणीने प्रथमच सतरा हजार मेगावॉटचा टप्पा ओलांडला आहे. ‘महावितरण’नेही विजेचा पुरवठा करण्याचा नवा विक्रम नोंदविला आहे.
सोमवारी राज्यात तब्बल १७ हजार २० मेगावॉटची मागणी नोंदविली गेली. ही मागणी आजवरची सर्वोच्च मागणी आहे. ‘महावितरण’नेही तब्बल १६ हजार १९४ मेगावॉट विजेचा पुरवठा करून विजेच्या उपलब्धतेचा नवा विक्रम नोंदविला आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यातच ८ तारखेला ‘महावितरण’ने सोळा हजार मेगावॉटचा वीजपुरवठा केला होता. गेल्या काही महिन्यांपासून ‘महावितरण’कडून नियमितपणे साडेपंधरा हजार मेगावॉट विजेपेक्षा जास्त वीजपुरवठा करण्यात येत आहे.
राज्यात विजेच्या उपलब्धतेचा प्रश्न राहिलेला नाही, असा दावा ‘महावितरण’कडून करण्यात येत आहे. ज्या भागामध्ये अनेकदा प्रयत्न करूनही अद्यापही नियमितपणे वीजबिले भरली जात नाहीत, अशाच १५ टक्के भागामध्ये वीजकपात केली जात आहे. या १५ टक्के भागात ४२ टक्क्य़ांपेक्षा जास्त वितरण व वाणिज्यिक हानी आहे, असे ‘महावितरण’चे म्हणणे आहे.

Story img Loader