महापालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या खोदकामात तुटलेल्या अति उच्चदाबाच्या भूमिगत वीजवाहिनीमुळे गंभीर तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने हे काम पूर्ण होण्यास अजूनही दोन दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे मध्य पुण्यातील काही भागांमध्ये अजूनही चक्राकार पद्धतीने वीजकपात करण्यात येत आहे.
महापालिकेच्या ठेकेदाराकडून जेसीबीच्या साहाय्याने सुरू असलेल्या खोदकामामध्ये सोमवारी पु. ल. देशपांडे उद्यानाजवळ अतिउच्चदाबाची वाहिनी तुटली. त्याच्या दुरुस्तीचे काम २४ तासांत पूर्ण होईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र, वाहिनी तुटल्याने गंभीर तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने हे काम अजूनही दोन दिवस सुरू राहील, असे ‘महावितरण’कडून सांगण्यात येत आहे.
तुटलेल्या वीजवाहिनीमुळे काही उच्चदाब औद्योगिक ग्राहकांच्या वीजपुरवठय़ावरही परिणाम झाला आहे. रास्ता पेठ, बंडगार्डन व पद्मावती विभागात वीजपुरवठा खंडित झालेल्या भागांमध्ये सोमवारपासूनच पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा करण्यात येत आहे. सुमारे ९५ टक्के भागात पर्यायी वीजपुरवठय़ा व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, काही परिसरात अद्यापही चक्राकार पद्धतीने वीजकपात करावी लागत आहे.
नवीन पर्वती, फुरसुंगी व मुंढवा आदी उपकेंद्रातून पर्यायी वीजपुरवठय़ाची व्यवस्था करण्यात आली आहे. तुटलेल्या वीजवाहिनीच्या दुरुस्तीला आणखी काही कालावधी लागणार असल्याने या कालावधीत पर्यायी वीजपुरवठय़ाच्या प्रक्रियेत भारव्यवस्थापन शक्य झाले नाही, तर नाइलाजास्ताव काही परिसरात वीजकपात करावी लागेल, असे ‘महावितरण’कडून कळविण्यात आले आहे.
मध्य पुण्यातील काही भागांत चक्राकार वीजकपात सुरूच
खोदकामात तुटलेल्या अति उच्चदाबाच्या भूमिगत वीजवाहिनीमुळे गंभीर तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने हे काम पूर्ण होण्यास अजूनही दोन दिवसांचा कालावधी लागणार आहे.
First published on: 23-01-2014 at 03:00 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mseb electric high voltage wire jcb cut