Maharashtra MSEB Employee Strike : पिंपरी- चिंचवडच्या भोसरी एमआयडीसीतील एक हजारहुन अधिक लघु उद्योजकांना महावितरण कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज फटका बसला होता. सकाळी साडेसात ते साडेअकरा असा तीन ते चार तास वीज पुरवठा खंडित होता. यामुळं लघु उद्योजकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे अशी माहिती पिंपरी-चिंचवड लघु उद्योजक संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी दिली आहे. महावितरणचे अधिकारी देखील या संपात सहभागी असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.
राज्यभर महावितरण च्या कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. यामुळं मावळ ग्रामीण भागासह पिंपरी- चिंचवडच्या एमआयडीसीला याचा थेट फटका सकाळी बसला. पिंपरी- चिंचवड शहरातील भोसरी एमआयडीसीत तीन ते चार तास वीजपुरवठा खंडीत झाला होता. याचा थेट फटका लघु उद्योजकांना बसला असून कोट्यवधींच नुकसान झाल्याचं संदीप बेलसरे यांनी सांगितलं आहे. एक हजारहून अधिक लघुउद्योग ठप्प होते. शेकडो कामगार बसून होते. मात्र, पुन्हा वीजपुरवठा सुरळीत झाल्याने लघुउद्योग सुरू झाले आहेत.
हेही वाचा… MSEB Employee Strike: भंडारा शहरावरही ‘ब्लॅक आऊट’चे संकट!; जिल्ह्यातील ७७५ वीज कर्मचारी संपावर
दरम्यान महावितरण कर्मचाऱ्यांचा संप झाला तरी काही फरक पडणार नाही असं महावितरणचे अधिकारी म्हणाले होते. पण आज सकाळी गेलेली वीज साडेअकराच्या सुमारास आली. त्यामुळं या महावितरण कर्मचाऱ्यांच्या संपाला महावितरण च्या अधिकाऱ्यांचा पाठिंबा आहे. ते देखील अप्रत्यक्षरीत्या संपात सहभागी आहेत असा आरोप लघु उद्योजक संघटनेने केला आहे.