‘महावितरण’ची वीजपुरवठा यंत्रणा असलेल्या सर्व विभागांत सर्वात कमी वितरण हानी व त्यामुळे सर्वाधिक उप्तन्न देणारा विभाग म्हणून पुणे विभागाची ओळख असली, तरी वीजव्यवस्थेबाबत या विभागाची फरफट सुरूच आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा देण्यासाठी दुरुस्ती व देखभालीच्या दृष्टीने आवश्यक असलेले पुरेसे साहित्यही यंदा पुणे विभागाला मिळालेले नाही. त्यामुळे पहिल्याच पावसापासून पुणे व िपपरी-चिंचवडमध्ये विजेसंदर्भातील समस्या निर्माण झाल्या आहेत.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वादळवाऱ्यामुळे त्याचप्रमाणे यंत्रणेतील बिघाडामुळे विद्युतपुरवठा खंडित होण्याचे प्रकार होत असतात. या प्रकारांना आळा घालण्याच्या दृष्टीने पावसाळ्याच्या पूर्वी देखभाल व दुरुस्तीची कामे केली जातात. वीजपुरवठय़ाची यंत्रणा सुरळीत राहण्यासाठी ही कामे अत्यंत महत्त्वाची असतात. मात्र, मागील अनेक वर्षांपासून या गोष्टीकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याचे अनेकदा उघड झाले आहे. यंदा पुणे विभागाला दुरुस्ती व देखभालीसाठी पुरेसे साहित्यच दिले नसल्याची बाब सजग नागरी मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी माहिती अधिकारात मागविलेल्या माहितीतून उघडकीस आली आहे. पावसाळ्याच्या पूर्वी करण्यात येणाऱ्या कामासांठी पुणे विभागातील गणेशखिंड, रास्ता पेठ व पुणे ग्रामीण झोनकडून ९६ प्रकारच्या साहित्याची मागणी करण्यात आली होती. त्यातील केवळ १७ प्रकारचेच साहित्य पुरविण्यात आले आहे.
राज्यातील ‘महावितरण’च्या एकूण वीजग्राहकांपैकी सुमारे १० टक्के ग्राहक पुणे विभागात आहेत. या विभागात विजेची चोरी व गळतीचे प्रमाण सर्वात कमी असल्याने मोठय़ा प्रमाणावर उत्पन्न ‘महावितरण’ला मिळते. ‘महावितरण’च्या एकूण उत्पन्नापैकी १६ टक्के उत्पन्न एकटय़ा पुणे विभागातून मिळते. वीज वितरण हानी कमी असल्याने या विभागातील पुणे व िपपरी-चिंचवड शहराचा समावेश ‘महावितरण’च्या सर्वोच्च ए-वन या गटात करण्यात आला आहे. असे असतानाही देखभाल व दुरुस्तीसाठी पुरेसे साहित्य उपलब्ध करून दिले नसल्याने त्याचा फटका पुणेकरांना पहिल्याच पावसात बसला. पावसानंतर शहरात अनेक ठिकाणी वीज गायब झाली होती. पुरेसे साहित्य न मिळाल्याबाबत वेलणकर यांनी ‘महावितरण’च्या व्यवस्थापकीय संचालकांना पत्र लिहिले असून, या प्रकरणात प्राधान्याने लक्ष घालण्याची मागणी त्यांनी केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा