एमएसईबीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे एका तीन वर्षांच्या बालकाला कोंढव्यात जीव गमवावा लागला आहे. उघडय़ा डीपीच्या वायरमधील विजेचा धक्का लागल्याने या तीन वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना कोंढव्यातील अशरफनगर घडली. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एमएसईबीच्या सहायक अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुफीयान अर्शन अन्सारी (वय ३, रा. अशरफनगर, कोंढवा) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी लाइनमन कैलास लष्करे, सहायक अभियंता श्रीकांत काशिराम लोथे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता विश्वासराव देशमुख यांच्या विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक ए. पाटील यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील अशरफनगर भागात दाट लोकवस्ती आहे. या ठिकाणी विजेचा डीपी उघडा असल्यामुळे ५ जून रोजी अन्सारी हा खेळत असताना त्या उघडय़ा डीपीजवळ गेला. या डीपीमधील वायरमध्ये असलेल्या विजेचा धक्का लागून तो गंभीर जखमी झाला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, या गुन्ह्य़ाचा तपास केला असता यामध्ये एमएसईबीचे अधिकारी व कर्मचारी यांनी हलगर्जीपणा केल्याचे आढळून आले आहे. अशरफनगरमध्ये दाट लोकवस्ती आहे. या भागातील नागरिकांच्या जीविताच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कोणतीही काळजी व सुरक्षा एमएसईबीच्या अधिकाऱ्यांनी घेतली नाही. या ठिकाणच्या डीपीचा दरवाजास कुलूप न लावता उघडा ठेवला होता. त्यामुळे तीन वर्षांच्या मुलाचा या ठिकाणी विजेला चिकटून मृत्यू झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे एमएसईबीच्या दोन अधिकाऱ्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक शिकलगर हे अधिक तपास करीत आहेत.

Story img Loader