अकोला ते औरंगाबाद दरम्यान असलेल्या वीजवाहिनीच्या क्षमतावाढीच्या कामामुळे एक हजार मेगावॉट विजेच्या पुरवठय़ावर परिणाम होणार असल्याने पुण्यासह राज्याच्या विविध भागात वीजकपातीची शक्यता आहे. मात्र, शुक्रवारी पर्यायी विजेचा पुरवठा व्यवस्थित झाल्याने वीजकपात टळली. २७ एप्रिलपर्यंत हे काम सुरू राहणार असल्याने या काळात अगदी अपवादात्मक स्थितीतच शहरात चक्राकार पद्धतीने वीजकपात केली जाईल, असे ‘महावितरण’कडून सांगण्यात आले.
वाहिनीचे काम सुरू झाल्यानंतर पुण्यासह नवी मुंबई, ठाणे, औरंगाबाद, जालना, कोल्हापूर, अहमदनगर, बारामती, सोलापूर या विभागांमध्ये वीजकपात होण्याची शक्यता ‘महावितरण’कडून वर्तविण्यात आली आहे. अपुऱ्या पडणारी वीज इतर विभागातून घेऊन ती परिणाम होणाऱ्या भागात पोहोचविण्याचे नियोजनही करण्यात आले आहे. त्यामुळे कोयना, उरण, नाशिक, भुसावळ आदी वीज केंद्रातून पर्यायी विजेची व्यवस्था करण्यात येत आहे. त्यामुळे पुणे शहरात शुक्रवारी कोणत्याही प्रकारची वीजकपात झाली नसल्याने महावितरण कंपनीकडून सांगण्यात आले.
वीजबिलांच्या वसुलीनुसार ‘महावितरण’कडून वेगवेगळे गट तयार करण्यात आले आहे. पुणे शहर सर्वात वरच्या गटात असल्याने या ठिकाणी अगदी अपवादात्मक स्थितीतच वीजकपात होईल. वीजकपातीची गरज पडल्यास ती खालच्या गटांमध्ये केली जाईल. पुण्यामध्ये वीजकपात करावी लागलीच तर केवळ दोन ते तीन तासांपर्यंत चक्राकार पद्धतीने वीजकपात केली जाऊ शकते, असे ‘महावितरण’ने स्पष्ट केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा