वीजग्राहकांच्या तक्रारी तत्काळ निकाली काढण्याच्या दृष्टीने ‘महावितरण’कडून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या मंगळवारी संपूर्ण विभागात तक्रार निवारण दिनाच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. विजेबाबत इतर वेळेला विविध तक्रारी केल्या जातात व ‘महावितरण’च्या कामाबाबत रोषही व्यक्त केला जातो. पण, तक्रार निवारण दिनातील तक्रारींची संख्या पाहता ‘महावितरण’ कडून चांगले काम होते आहे की तक्रारींबाबत ग्राहकांमध्ये अनास्था आहे, हा प्रश्न निर्माण होतो.
प्रत्येक महिन्याला घेण्यात येणारा तक्रार निवारण दिन हा उपक्रम पुणे परिमंडलातील सर्व विभागीय कार्यालयांमध्ये आयोजित करण्यात येतो. तक्रारी करण्यासाठी दिलेल्या कालावधीमध्ये त्या-त्या विभागातील कार्यकारी अभियंता हे स्वत: तक्रारींवर सुनावणी घेतात. पुणे परिमंडलामध्ये ‘महावितरण’ ची रास्ता पेठ, पद्मावती, नगर रस्ता, पर्वती, बंडगार्डन, कोथरूड, िपपरी, भोसरी, शिवाजीनगर त्याचप्रमाणे ग्रामीण विभागात मंचर, राजगुरूनगर आणि मुळशी येथे विभागीय कार्यालये आहेत. या विभागीय कार्यालयांमध्ये तक्रार निवारण दिनाचे आयोजन केले जाते. वीजबिल, नवीन वीजजोडण्या आदींबरोबरच वीजसेवेशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या तक्रारी या उपक्रमात करता येतात. सुनावणीनंतर बहुतांश तक्रारींचे तत्काळ निवारण करण्यात येते, असे ‘महावितरण’कडून सांगण्यात येते.
मे महिन्यातील वीजग्राहक तक्रार निवारण दिनाचे ६ मे रोजी आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामध्ये पुणे परिमंडळातील सर्व विभागीय कार्यालयांमध्ये केवळ १८ तक्रारी दाखल झाल्या. त्यातील नऊ तक्रारी तत्काळ निकाली काढण्यात आल्या, तर इतर नऊ तक्रारींमध्ये सार्वजनिक स्वरूपाच्या तसेच मीटर तपासणी करणे, मीटर बदलून देण्याबाबतच्या तक्रारी होत्या. या तक्रारींच्या निवारणासाठी संबंधित उपविभागीय कार्यालयांकडून कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या.
सातत्याने वीज गायब होणे, वीजबिलातील चुका, जास्तीचे वीजबिल, चुकीचे मीटर रिडिंग आदींबाबत ग्राहकांकडून वेळोवेळी मोठय़ा प्रमाणावर तक्रारी केल्या जातात. पण, तक्रार निवारण दिनामध्ये तक्रारींचा दुष्काळ का जाणवतो, याचे उत्तर काही सापडत नाही. या उपक्रमात तत्काळ तक्रार निकाली निघणार असेल, तर वीजग्राहकांकडून या उपक्रमाचा मोठय़ा प्रमाणावर उपयोग व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा