वीजनिर्मिती केंद्रामध्ये निर्माण झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे पुणे व पिंपरी-चिंचवडकरांना रविवारपासून वीजकपातीला सामोरे जावे लागत होते. या परिस्थितीत सुधारणा झाल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत होत असतानाच बुधवारी रात्री झालेल्या वादळी पावसामुळे परळी-लोणीकंद व इतर वाहिन्यांचे सुमारे ११ टॉवर कोसळल्याने पुन्हा विजेचे संकट निर्माण होऊन पुणेकरांना वीजकपातीचा फटका बसला. ‘ए प्लस’ या महत्त्वाच्या गटात असलेल्या पुण्यात विजेच्या मोठय़ा संकटातच वीजकपात केली जाते. मात्र, सलग दुसऱ्यांदा विजेचे संकट निर्माण झाल्याने गेल्या चार वर्षांतून पहिल्यांदाच शहरात सर्वाधिक दिवस वीजकपात होत आहे.
अदानी, जेएसडब्ल्यू त्याचप्रमाणे केंद्रीय वीजनिर्मिती प्रकल्पांमध्ये रविवारी तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने राज्यात सुमारे तीन हजार मेगावॉट विजेची तूट निर्माण झाली होती. ही तूट तातडीने भरून काढणे शक्य नसल्याने पुण्यामध्ये ‘ब’ गटात मोडणाऱ्या वाहिन्यांवर दोन तासांची वीजकपात सुरू करण्यात आली. मंगळवापर्यंत काही वीजनिर्मिती केंद्र सुरू झाले. त्याचप्रमाणे दुसरीकडून अतिरिक्त वीज मिळविण्यातही ‘महावितरण’ला यश आले. त्यामुळे बुधवारी शहरातील वीजपुरवठा सुरळीत झाला.
विजेचे संकट दूर झाल्याने महावितरणच्या अधिकाऱ्यांनी व ग्राहकांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला असतानाच बुधवारी रात्री वादळी पाऊस झाला. त्यामुळे परळी-लोणीकंद या वाहिनीचे दोन टॉवर वाकले. त्याचप्रमाणे श्रीगोंदा तालुक्यातील आष्टी, पिंपरी भागातील रिलायन्सच्या अखत्यारितील दहा टॉवर कोसळले. या कोसळलेल्या टॉवरमुळे सुमारे १२०० मेगावॉट विजेचे वहन पूर्णपणे थांबले. त्याचा परिणाम म्हणून पुणे, सातारा जिल्ह्य़ातील विजेवर झाला.
अचानक मोठय़ा प्रमाणावर पुन्हा विजेची तूट निर्माण झाल्याने पुणे व िपपरी-चिंचवड शहरात त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्य़ातील बारामती, तळेगाव, लोणीकंद व लगतच्या भागामध्येही वीजकपात करावी लागली. पुणे व िपपरी-चिंचवड शहरामध्ये ‘अ’ गटामधील काही वाहिन्यांमध्ये चाळीस मिनिटे ते दीड तासांपर्यंत वीजकपात करावी लागली. ‘ब’ गटातील दहा वाहिन्यांवर दोन तासांची वीजकपात करण्यात आली. त्यामुळे रविवारपासून हा आठवडा पुणेकरांसाठी वीजकपातीचा ठरतो आहे.
कोसळलेल्या टॉवरची दुरुस्ती युद्धपातळीवर करण्यात येत आहे. महापारेषण कंपनीचे कर्मचारी व सर्वच अधिकारी सध्या या कामाला लागले आहेत. महापारेषण कंपनीचा टॉवर सोमवापर्यंत, तर रिलायन्सचे १० टॉवर दुरुस्तीसाठी अधिक कालावधी लागण्याची शक्यता असल्याचे महावितरण कंपनीकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे पुणेकरांना आणखी किती दिवस वीजकपातीला सामोरे जावे लागेल, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा