महापालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या खोदकामामध्ये महापारेषण कंपनीची भूमिगत उच्चदाब वीजवाहिनी तुटल्याने सोमवारी शहराचा पूर्व भाग अंधारात बुडाला. तुटलेल्या वाहिनीची दुरुस्ती अत्यंत किचकट असल्याने त्यासाठी २४ तासांचा कालावधी लागणार असल्याचे सांगण्यात येत असून, मंगळवारी संध्याकाळपर्यंत हे काम पूर्ण होऊ शकणार आहे. त्यामुळे मंगळवारीही या भागामध्ये वीजपुरवठय़ात अडथळे येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यानाजवळ महापालिकेच्या वतीने जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम करण्यात येत आहे. सोमवारी दुपारी सव्वाचारच्या सुमारास या खोदकामात उच्चदाबाची १३२ केव्ही क्षमतेची भूमिगत वीजवाहिनी तुटली. त्यामुळे रास्ता पेठ वीज उपकेंद्राला होणारा वीजपुरवठा ठप्प झाला. परिणामी, या वीज उपकेंद्रातून शहराच्या पूर्व भागाला होणारा वीजपुरवठा खंडित झाला. रास्ता पेठ, पद्मावती व बंडगार्डन विभागावर त्याचा परिणाम झाला. ‘महावितरण’च्या वतीने या विभागांमध्ये पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही ठिकाणी चक्राकार पद्धतीने वीजकपात करावी लागली.
खोदकामात तुटलेल्या वाहिनीची दुरुस्ती महापारेषण कंपनीच्या वतीने तातडीने हाती घेण्यात आली आहे. रात्रीही युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. मात्र, तरीही हे काम पूर्ण होण्यास २४ तासांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे भवानी पेठ, शंकरशेठ रस्ता, गंज पेठ, घोरपडी, गुलटेकडी, रविवार पेठ, रास्ता पेठ, बुधवार पेठ, सोमवार पेठ, नाना पेठ, गणेश पेठ, कॅम्प परिसर, स्वारगेट, गुरुवार पेठ, शुक्रवार पेठ यांना पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठय़ाचे प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, रात्री बहुतांश भागात अंधार होता.
ज्या ठिकाणी पर्यायी व्यवस्थेतून वीज देणे शक्य नाही, तेथे चक्राकार पद्धतीची वीजकपात सुरू करण्यात आली आहे. दुरुस्तीचे काम मंगळवारी संध्याकाळपर्यंत पूर्ण होऊ शकणार आहे. त्यानंतर या विभागांतील वीजपुरवठा सुरळीत होईल, असे ‘महावितरण’कडून कळविण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा