वीजबिल भरणा केंद्राच्या रांगेत उभे राहण्यापेक्षा इंटरनेटच्या माध्यमातून कधीही व कुठूनही क्षणात वीजबिल भरण्याच्या सुविधेला पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. वीजबिलाचा भरणा ऑनलाइन पद्धतीने करणाऱ्या ग्राहकांची संख्या पुणे विभागात दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जूनमध्ये पुणेकरांनी याबाबत एक विक्रमच नोंदविला पुणे विभागातील तीन लाख ६१ हजार २४८ ग्राहकांनी ऑनलाइन पद्धतीने वीजबिलाचा भरणा करून तब्बल ६६ कोटी ४३ लाख रुपये महावितरणच्या तिजोरीत जमा केले. आजवरचा हा उच्चांक ठरला आहे
महावितरण कंपनीच्या वतीने ग्राहकांसाठी इंटरनेटच्या माध्यमातून वीजबिल देण्याची व्यवस्था करण्याबरोबरच ऑनलाइन पद्धतीने वीजबिलांचा भरणा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही सुविधा सुरू केल्यापासूनच पुण्यात त्याला सर्वाधिक प्रतिसाद मिळतो आहे. या सुविधेमुळे वीजबिल भरणा केंद्रापर्यंत जाऊन तेथे रांगेत उभे राहावे लागत नाही. अगदी घरबसल्या बिलाचा भरणा होऊ शकतो. त्यामुळे वीजबिल भरणा केंद्रांवरील गर्दी बरोबरच महावितरण कंपनीवरील ताणही कमी होत आहे.
डिसेंबर २०१४ मध्ये साडेतीन लाख वीजग्राहकांनी ५२ कोटी ३० लाख रुपयांच्या वीजबिलांचा ऑनलाइन भरणा केला होता. त्यानंतर जानेवारी ते मे २०१५ मध्ये त्यात वाढ झाली व जूनमध्ये उच्चांक नोंदविला गोला. मागील दीड वर्षांमध्ये ऑनलाइन वीजबिल भरणाऱ्यांची संख्या दुपटीने वाढली आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही ऑनलाइन वीजबिल भरणा करणाऱ्यांची संख्या वाढते आहे. जूनमध्ये ग्रामीण भागातील २७ हजार १३४ ग्राहकांनी पाच कोटी ९९ लाख रुपयांचे वीजबिल ऑनलाइन पद्धतीने जमा केले.
महावितरण कंपनीच्या वतीने http://www.mahadiscom.in या संकेतस्थळावर वीजबिलांचा भरणा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व लघुदाब ग्राहकांना क्रेडिट किंवा डेबिट कार्ड किंवा नेटबँकिंगच्या माध्यमातून वीजबिल भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. ऑनलाइन भरणा करण्याबरोबरच इ-मेलद्वारे वीजबिल मिळविण्याची व्यवस्थाही आहे. छापील वीजबिलाऐवजी केवळ ई-मेलवरील बिल हवे असल्यास गो-ग्रीन हा पर्यायही उपलब्ध करून देण्यात आला आहे. गो- ग्रीनमध्ये वीजबिलामध्ये तीन रुपयांची सूट दिली जाते. वीजबिल भरण्याची मुदत संपल्यानंतर दंडाच्या रकमेसह वीजबिल भरण्याची सुविधा ऑनलाइन यंत्रणेत उपलब्ध आहे. संकेतस्थळावर याबाबतची सर्व माहिती देण्यात आली आहे.

Story img Loader