कोणत्याही चांगल्या गोष्टीला किंवा योजनेला पुण्यात नेहमीच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतो, त्याचे आणखी एका उदाहारण ऑनलाईन पद्धतीने वीजबिल भरण्यात राज्यात आघाडी घेऊन पुणेकरांनी दाखवून दिले आहे. मागील वर्षांमध्ये पुणे विभागातील तब्बल ३५ लाख २९ हजार ६३९ वीज ग्राहकांनी ऑनलाईन यंत्रणेच्या माध्यमातून ४६० कोटी ८७ रुपयांच्या वीजबिलांचा भरणा केला. ही आकडेवारी राज्यातील कोणत्याही विभागापेक्षा सर्वाधिक आहे. वीज यंत्रणेतील दोष व बिघाडामुळे महावितरण कंपनीबाबत ग्राहकांकडून सातत्याने वेगवेगळ्या तक्रारी केल्या जातात, पण दुसऱ्या बाजूला चांगल्या योजनांमध्ये सहभाग घेत यंत्रणेचे कौतुकही केले जात असल्याचे यावरून दिसते आहे.
ग्राहकांना वीजसेवा देत असतानाच आधुनिक यंत्रणांचा वापर करून अधिकाधिक सुविधा देण्याच्या उद्देशाने मागील काही वर्षांपासून महावितरण कंपनीने विविध गोष्टींमध्ये माहिती- तंत्रज्ञान क्षेत्राचा आधार घेतला. त्याचाच एक भाग म्हणून घरबसल्या व कोणत्याही ठिकाणावरून वीजबिल भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा सुरू करण्यात आली. या योजनेच्या सुरुवातीपासूनच पुण्यातून त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
वीजबिल भरण्यासाठी घरी वीजबिल येण्याची वाट पाहत बसणे व त्यानंतर वीजबिल भरणा केंद्रांच्या रांगेत वेळ घालविण्याचे टाळून अनेकांनी ऑनलाईन वीजबिल भरण्याचा पर्याय स्वीकारला. २०१३ मध्ये २८ लाख ३१ हजार ७९५ वीजग्राहकांनी ऑनलाईन पद्धतीने ३५६ कोटी ७८ लाख रुपयांच्या वीजबिलांचा भरणा केला होता. त्या वेळीही या पद्धतीत सहभाग घेण्यामध्ये पुणे विभाग आघाडीवर होता. २०१४ मध्ये ऑनलाईन ग्राहकांमध्ये सुमारे आठ लाखांनी वाढ झाली व या वेळीही राज्यात पुणे विभागाने आघाडी कायम ठेवली आहे.
ऑनलाईनसह एटीपी यंत्रणांद्वारे वीजबिल भरणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. महावितरण कंपनीच्या वतीने शहरी भागात अशी वीस यंत्रे बसविली आहेत. २०१४ मध्ये पुणे विभागात ९ लाख ३२ हजार १५० ग्राहकांनी या यंत्रांच्या माध्यमातून १७९ कोटी ३३ लाख रुपयांच्या वीजबिलाचा भरणा केला.
ऑनलाईन वीजबिल भरण्यासाठी
महावितरण कंपनीच्या http://www.mahadiscom.in या संकेतस्थळावर ऑनलाईन वीजबिल भरणा करण्याची सुविधा उपलब्ध आहे. याच संकेतस्थळावर आपले वीजबिलही पाहता येते. त्याची प्रिंट काढून त्याद्वारेही बिल भरता येते. ऑनलाईन सुविधा सर्व लघुदाब ग्राहकांसाठी असून, क्रेडीट कार्ड, डेबीट कार्ड त्याचप्रमाणे नेटबँकिंगद्वारेही वीजबिल भरणा करण्याचा पर्याय देण्यात आला आहे.
ऑनलाईन वीजबिल भरण्यात पुणे आघाडीवर!
कोणत्याही चांगल्या गोष्टीला किंवा योजनेला पुण्यात नेहमीच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतो, त्याचे आणखी एका उदाहारण ऑनलाईन पद्धतीने वीजबिल भरण्यात राज्यात आघाडी घेऊन पुणेकरांनी दाखवून दिले आहे.
First published on: 23-01-2015 at 03:25 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mseb online bill response