पुणे परिमंडलातील वीजग्राहकांना सध्या देण्यात आलेल्या अतिरिक्त सुरक्षा ठेवींची वीजबिलेही www.mahadiscom.in या संकेतस्थळावर ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सुरक्षा ठेवीची माहितीही संबंधित ग्राहकांना संकेतस्थळावरून मिळू शकणार आहे.
‘महावितरण’च्या पुणे परिमंडलातील वीजग्राहकांना एप्रिल व मे महिन्याच्या वीजबिलांसोबत अतिरिक्त सुरक्षा ठेव भरण्यासाठी स्वतंत्र बिले देण्यात आलेली आहेत. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व वर्गवारीतील वीजग्राहकांनी सुरक्षा ठेव जमा करणे बंधनकारक आहे. आर्थिक वर्षांतील एका महिन्याच्या सरासरी इतके बिल सुरक्षा ठेव म्हणून जमा करावे लागते.
ग्राहकांनी यापूर्वी सुरक्षा ठेव जमा केली असली, तरी वीजदरातील वाढ व विजेचा वापर वाढल्यास वीजबिलाची रक्कम वाढते. त्यामुळे एक महिन्याचे सरासरी बिलही वाढल्याने सुरक्षा ठेवही वाढवावी लागते. मूळ सुरक्षा ठेव व गेल्या आर्थिक वर्षांतील एका महिन्याचे सरासरी बिल यातील फरकाच्या रकमेचे बिल अतिरिक्त सुरक्षा ठेव म्हणून ग्राहकांना देण्यात आले आहे. या सुरक्षा ठेवीवर कालावधीनुसार ९.५ टक्क्य़ांपर्यंत व्याज देण्याचेही राज्य विद्युत नियामक आयोगाचे निर्देश आहेत.
वीजबिलाचा भरणा ऑनलाइन पद्धतीने करणाऱ्या ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीची रक्कम भरणेही सुलभ व्हावे, या दृष्टीने महावितरणच्या संकेतस्थळावर सुरक्षा ठेवीची माहितीही उपलब्ध करून देण्यात आली आहे. संकेतस्थळावरील ‘मेक पेमेंट’ या रकान्यात सिक्युरिटी डिपॉझिटवर क्लिक केल्यानंतर रकमेची माहिती उपलब्ध होईल व या रकमेचा भरणा ऑनलाइन करता येईल, असे ‘महावितरण’कडून कळविण्यात आले आहे.