पिंपरी महापालिकेच्या विद्युत विभागातील अधिकाऱ्यांनी ठेकेदारांचा चालविलेला छळ अजूनही सुरूच असल्याची माहिती पुढे आली आहे. टक्केवारीचे पंचामृत न  देणाऱ्या ठेकेदारांची बिले अडवणाऱ्या व शक्य तिथे त्यांच्याकडून मलिदा लाटणाऱ्या ‘त्या’ अधिकाऱ्यांचे बिंग विरोधी पक्षनेते विनोद नढे यांनी नव्याने फोडले आहे. या  विभागातील घोटाळ्यांची जंत्री देत चौकशीची मागणी नढेंनी आयुक्तांकडे केली असून त्यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.
विद्युत विभागातील दोन बडय़ा अधिकाऱ्यांनी गेल्या १२ वर्षांत शेकडो कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप नढे यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात केला आहे. ठेकेदारांनी अनावश्यक केबल व साहित्याची खरेदी करून ठेवली आहे. त्यांनी खरेदी केलेल्या मूनलाईट फिटिंग वर्षांनुवर्षे भांडार विभागात पडून आहेत. आता त्या ‘मार्गी’ लावण्यासाठी प्रत्येक अभियंत्याला ‘टार्गेट’ देण्यात आले आहे. अनावश्यक खरेदीप्रकरणी त्या अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही. ७० लाख रुपये किमतीच्या केबलची परस्पर विल्हेवाट लावण्यात आली. प्रकरण उघड होईल, या भीतीने दुसऱ्याच कंपनीची केबल पालिकेकडे जमा करण्यात आली. नगरसेवकांनी हा प्रकार उघडकीस आणला. मात्र, वर्षभरानंतरही त्या अधिकाऱ्याकडून पैशांची वसुली झालेली नाही. नोटिसा, अहवाल, अभिप्राय मागविण्यात आले. सभेत चर्चा झाली. मात्र, कारवाई झाली नाही. अधिकारी सभेत देखील खोटी उत्तरे देतात. विधानसभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नांनासुद्धा खोटीच माहिती देण्यात आली होती. एका ठेकेदाराला ६४ लाख रुपये जादा देण्यात आले. ते वसूल करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. मात्र, अद्याप एकही पैसा वसूल झालेला नाही, याकडे नढे यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले आहे.
लग्नाचा खर्च ठेकेदारांच्या गळ्यात
विद्युत विभागाचे अधिकारी ठेकेदारांची बिले जाणीवपूर्वक अडवून ठेवतात, हेलपाटे मारायला लावतात. अशाच पद्धतीने दोन ठेकेदारांची जाणीवपूर्वक अडवून ठेवलेली बिले देण्यासाठी एका अधिकाऱ्याने स्वत:च्या मुलीच्या लग्नातील जेवणाचा खर्च करायला भाग पाडले, अशी माहिती यानिमित्ताने उघड झाली आहे.

Story img Loader