पुणे : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडी साेडविण्यासाठी नऊ उड्डाणपूल उभारण्याचा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा (एमएसआरडीसी) आराखडा सात वर्षांपासून प्रलंबित असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रस्तावाला केंद्रीय भूपृष्ठ मंत्रालयाने कोणताही प्रतिसाद दिला नसल्याने या महामार्गावरील कोंडी कायम आहे.
‘एमएसआरडीसी’ने या महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी आणि अपघाताच्या समस्या सोडविण्यासाठी गर्दीची नऊ ठिकाणे निश्चित करून त्या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याबाबतचा प्रस्ताव २०१८ मध्ये केंद्र सरकारकडे पाठविला. द्रुतगती महामार्ग असला, तरी या महामार्गावर वाहनांची गर्दी असल्याने कोंडी सोडविण्यासाठी तज्ज्ञांच्या मदतीने अहवाल तयार करण्यात आला. त्यामध्ये अपघातांची संख्या आणि वाहतूक कोंडी होणारे चौक, गावे यांचा आढावा घेण्यात आला.
खोपोली आणि लोणावळादरम्यान १६ किलोमीटर अंतरावर तीव्र वळण आणि चढ-उतार यामुळे वेग मंदावून अपघात होत असल्याने नऊ ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याची शिफारस या आराखड्यात करण्यात आली. त्यानंतर या बाबतचा प्रस्ताव केंद्रीय भूपृष्ठ मंत्रालयाकडे पाठविण्यात आला. मात्र, हा प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहे.
उड्डाणपुलांची नऊ ठिकाणे
सोमाटणे फाटा, लिंब फाटा, तळेगाव-चाकण रस्ता, एमआयडीसी वडगाव, देहूरोड वाय जंक्शन, वडगाव फाटा, निगडी फाटा ते कामशेत, कार्ला फाटा, कान्हे फाटा या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याचे आराखड्यात सुचविण्यात आले होते.
आराखड्यातील ठळक बाबी
- प्रत्येक उड्डाणपूल सुमारे ३०० ते ५०० मीटर लांबीचे
- उड्डाणपुलासाठी २०८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित (सात वर्षापूर्वी)
- सार्वजनिक, खासगी, भागीदारी (पीपीपी) तत्त्वानुसार उड्डाणपूल बांधण्याचे नियोजन
- मुंबई-पुणे प्रवासाचा कालावधी ४५ मिनिटे कमी होण्याचा अंदाज
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील वाहूतक कोंडी सोडविण्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार नऊ उड्डाणपुलांचा आराखडा तयार करण्यात आला. याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय भूपृष्ठ मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे. अद्याप या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आलेली नाही. – राहुल वसईकर, अधीक्षक अभियंता, एमएसआरडीसी