पुणे : एसटी स्थानक म्हटले की सगळीकडे अस्वच्छता, स्वच्छतागृहांची दुरवस्था, दुर्गंधी, मोडलेल्या खुर्च्या आणि रया गेलेली इमारत असे चित्र सर्वसाधारणपणे दिसते. हे चित्र बदलण्यासाठी स्वच्छ व सुंदर एसटी बस स्थानकांचे अभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत झालेल्या सर्वेक्षणात पुण्यातील प्रमुख स्थानकांपैकी स्वारगेट आणि शिवाजीनगर (वाकडेवाडी) काठावर उत्तीर्ण झाली असून, पुणे स्थानक अनुत्तीर्ण ठरले आहे.
हेही वाचा >>> पुणे : गुपित उलगडेना! मेट्रोची ‘बत्ती गुल’ कोणामुळे?
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाचीही वाहतूक स्वच्छ आणि सुंदर वातावरणात व्हावी, अशी सूचना एसटी महामंडळाचे अध्यक्ष व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यानुसार एसटी महामंडळाने राज्यातील ५७७ एसटी बसस्थानके स्वच्छ, सुंदर बनवण्यासाठी पाऊल उचलले. यासाठी बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान सुरू केले. यात राज्यातील सर्व बसस्थानकांचे मे आणि जून महिन्यातील कामगिरीचे मूल्यमापन जुलैमध्ये करण्यात आले. दर दोन महिन्यांनी हे मूल्यमापन करून अंतिम गुण निश्चित करून विजेती स्थानके ठरविली जाणार आहेत.
यात पुणे विभागातील ४२ स्थानकांचे सर्वेक्षण करून त्यांचे मूल्यमापन करण्यात आले. पुण्यातील प्रमुख स्थानकांपैकी स्वारगेटला ५९ गुण, शिवाजीनगरला ५२ गुण आणि पुणे स्थानकाला ४० गुण मिळाले. हे गुण १०० पैकी असून, ५० गुणांच्या पुढे स्थानके उत्तीर्ण असल्याचे गृहित धरले जाते. म्हणजेच स्वारगेट आणि शिवाजीनगर ही स्थानके काठावर उत्तीर्ण झाली असून, पुणे रेल्वे स्थानक अनुत्तीर्ण ठरले आहे. पुणे विभागात नारायणगाव स्थानक ७४ गुणांसह प्रथम स्थानी आहे.
हेही वाचा >>> मंत्री हसन मुश्रीफ थेट ससून रुग्णालयात येतात तेव्हा…
सर्व बसस्थानकातील स्वच्छतेचे मूल्यमापन करण्यासाठी परीक्षण समित्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. या समित्या दुसऱ्या विभागात जाऊन दर दोन महिन्यांनी मूल्यमापन करीत आहेत. त्यात बसस्थानक परिसर, स्वच्छतागृह, बसची स्वच्छता, सुशोभीकरण याआधारे गुण दिले जातील. तसेच, कर्मचाऱ्यांचे प्रवाशांसोबत सौजन्याने वागणे, उत्पन्न वाढीसाठी केलेली प्रयत्न, बसचे वेळापत्रक अशा प्रकारच्या प्रवासी अभियानासाठीही गुण दिले जातात.
स्थानकांना गुण कशाच्या आधारे?
– बसस्थानक, परिसर व स्वच्छतागृहे : ५० गुण
– बस गाड्यांची स्वच्छता : २५ गुण
– कर्मचाऱ्यांची सौज्यनशीलता, प्रवासी अभियान : २५ गुण
काही बसस्थानकांमध्ये आम्हाला गुण कमी मिळाले आहेत. त्या ठिकाणी लोकसहभागातून दुरुस्ती आणि सुशोभीकरणाची कामे करण्याचे नियोजन आहे. दर दोन महिन्यांनी सर्वेक्षण होणार असून, स्थानकांचे चित्र बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे.
– कैलास पाटील, विभाग नियंत्रक, एसटी
एकूण दोन कोटींची बक्षिसे
स्वच्छ, सुंदर बस स्थानकांना प्रदेश व विभागनिहाय बक्षिसे दिली जाणार आहेत. पहिला क्रमांक पटकावणाऱ्या बसस्थानकांना प्रदेश व विभागनिहाय ५० लाख, २५ लाख, तर १० लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. या अभियानांतर्गत बस स्थानकांना एकूण दोन कोटींची बक्षिसे दिली जाणार आहेत.