पुणे मतदारसंघासह बारामती, मावळ, शिरूर या लोकसभा मतदारसंघांमध्ये उन्हाचा कडाका असतानाही नागरिकांनी उत्स्फूर्त मतदान केले. पुण्यात तर या वेळी २००९ च्या तुलनेत सुमारे दीडपट मतदान होऊन टक्केवारी ५८.५० टक्क्यांवर पोहोचली. इतक्या मोठय़ा प्रमाणात टक्केवारी वाढल्याने निकालाबाबत उत्सुकता लागली आहे. दरम्यान, पुण्यातील मतदारयाद्यांमध्ये हजारो मतदारांची नावे नसल्याने मतदारांनी संताप व्यक्त केला आणि जिल्हाधिकारी व जिल्ह्य़ाचे निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ राव यांना घेराव घातला.
पुण्यात काँग्रेसचे व राहुल गांधी यांच्या ब्रिगेडचे विश्वजित कदम, भाजपचे अनिल शिरोळे आणि मनसेचे दीपक पायगुडे यांच्यात लढत होती. पुण्यात गेल्या वेळी लोकसभा निवडणुकीत केवळ ४०.६६ टक्के मतदान झाले होते. या ठिकाणी यंदा तब्बल ५८.५० टक्के मतदान झाल्याचे सौरभ राव यांनी सांगितले. वाढलेले मतदान नेमके कोणाच्या बाजूने जाणार याबाबत उत्सुकता वाढली आहे.
खासदार सुप्रिया सुळे निवडणूक लढवत असलेल्या बारामती मतदारसंघात ५८.५० टक्के मतदान झाले. तिथे त्यांच्याविरोधात महायुतीचे महादेव जावनकर हे उमेदवार होते. पिंपरी-चिंचवड आणि कोकणातील उरण-पनवेल यांचा समावेश असलेल्या मावळ मतदारसंघातील लढतही लक्षवेधी ठरली होती. येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्याग करून शेकापच्या तिकिटावर निवडणूक लढवणारे लक्ष्मण जगताप, शिवसेनेचे श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार राहुल नार्वेकर यांच्यात मुख्य लढत होती. जगताप यांनी राष्ट्रवादीशी काँग्रेसशी गद्दारी केल्याचा आरोप करत अजित पवार यांनी ही लढत प्रतिष्ठेची केली होती. तिथेही मतदानामध्ये तब्बल १८ टक्क्य़ांची वाढ झाली. तिथे ६२.१० टक्के मतदान झाले. त्यामुळे तिथेही निकालाबाबत प्रचंड उत्सुकता आहे.
खासदार शिवाजीराव आढळराव हे शिरूर मतदारसांतून तिसऱ्यांदा निवडणूक लढवत होते. तिथे त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे देवदत्त निकम आणि मनसेचे अशोक खांडेभराड हे निवडणूक लढवत होते. तिथेही आढळराव हे तिसऱ्यांचा निवडून येण्यासाठी प्रयत्नशील होते, तर त्यांचा पराभव करण्याचे आव्हान राष्ट्रवादीचे अजित पवार व दिलीप वळसे पाटील यांनी स्वीकारले होते. या मतदारसंघातील मतदानातही वाढ झाली. तिथे ५९.५० टक्के मतदान झाले. त्यामुले तिथल्या निकालाबाबतही उत्सुकता वाढली आहे.
(मतदानाची टक्केवारी)
मतदारसंघ        आताची टक्केवारी    २००९ टक्केवारी
पुणे                  ५८.५०                           ४०.६६
मावळ              ६२.१०                            ४४.७१
बारामती          ५८.२०                            ४६.०७
शिरूर               ५९.५०                            ५१.४५

Story img Loader