लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : पितृपक्षाच्या समाप्तीनंतर अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी गुरुवारी (३ ऑक्टोबर) घटस्थापना करून शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात होणार आहे. गुरुवारी ब्राह्म मुहूर्तापासून म्हणजे सुमारे पहाटे पाचपासून दुपारी पावणेदोनपर्यंत कोणत्याही वेळी घटस्थापना करून नवरात्रातील पूजन करता येईल. यावर्षी आश्विन शुक्ल तृतीया तिथीची वृद्धी झाल्याने नवरात्र दहा दिवसांचे आहे.
नवरात्रोत्सवातील ललिता पंचमी सोमवारी (७ ऑक्टोबर) असून गुरुवारी (१० ऑक्टोबर) घागरी फुंकून महालक्ष्मी पूजन करावयाचे आहे. शुक्रवारी (११ ऑक्टोबर) महाष्टमी आणि नवमीचा उपवास एकाच दिवशी असून शनिवारी विजया दशमीला (१०ऑक्टोबर) नवरात्रोत्थापन म्हणजेच नवरात्र समाप्ती आणि दसरा आहे, अशी माहिती ‘दाते पंचांगकर्ते’ मोहन दाते यांनी दिली.
आणखी वाचा-पुणे मेट्रोचा अजब कारभार! मेट्रोच्या तिकिटापेक्षा वाहनतळ शुल्कच जास्त
दाते म्हणाले, ‘वयोमानामुळे किंवा आरोग्य विषयक अडचणींमुळे ज्यांना नवरात्रीचे उपवास करणे शक्य नाही, त्यांनी उठता बसता म्हणजे नवरात्रीच्या पहिल्या आणि शेवटच्या दिवशी उपवास करावा. मात्र, ते ही शक्य नसल्यास किमान अष्टमीचा उपवास तरी करावा. अशौचामुळे किंवा इतर काही अडचणींमुळे ज्यांना ३ ऑक्टोबर रोजी घटस्थापना करणे शक्य होणार नाही त्यांनी अशौच निवृत्तीनंतर ५ ऑक्टोबर, ८ ऑक्टोबर, १० ऑक्टोबर किंवा ११ ऑक्टोबर यापैकी कोणत्याही दिवशी घटस्थापना करावी आणि १२ ऑक्टोबर रोजी नवरात्रोत्थापन करावे.
महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे) या दिवशी मध्यरात्री अष्टमी तिथीवर देवीचे पूजन करण्याची प्रथा आहे. अशी अष्टमी १० ऑक्टोबर रोजी मध्यरात्री असल्याने त्या दिवशी महालक्ष्मी पूजन दिलेले आहे. मात्र, दुर्गाष्टमी ११ ऑक्टोबर रोजी आहे. विजया दशमी, दसरा, सीमोल्लंघन हे १२ ऑक्टोबर रोजी असून साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दसरा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी विजय मुहूर्तावर अनेक लोक आपल्या नवीन उपक्रमाचा आरंभ करतात. हा विजय मुहूर्त महाराष्ट्रामध्ये दुपारी २ वाजून २२ मिनिटे ते ३ वाजून ९ मिनिटे या दरम्यान आहे.