मुकुलजींच्या बालपणी कवी अनिलांचे त्यांच्या घरी सातत्याने येणे-जाणे होते. कवी अनिल अधूनमधून देवास येथे कुमार गंधर्वाच्या घरी मुक्कामाला असत. लहानग्या मुकुलशी अनिलांची विशेष दोस्ती होती. अशाच एका मुक्कामातली गोष्ट. मुकुलजी तेव्हा साधारण बारा वर्षांचे होते. मुकुलजींच्या मातोश्री श्रीमती भानुमती कोमकली यांच्या अकाली निधनाला तेव्हा उणीपुरी सात वर्षे झाली होती. आईवेगळा लहानगा मुकुल एकटा राहतो आणि मन रिझवण्यासाठी सारखा गात राहतो. हे त्यांच्या नजरेतून सुटले नाही. त्यांच्या कवी मनात वत्सल खळबळ उडाली. एका रात्री झोपलेले असताना कसल्याशा आवाजाने कवी अनिलांना जाग आली. त्यांनी कानोसा घेतला. घरातून छोटय़ा मुकुलचा गाण्याचा आवाज येत होता आणि बाहेर तुफान पाऊस पडत होता. धुवांधार पाऊस.. बाहेरही होता.. आणि आतही.. कवी अनिल बेचैन झाले. त्यांनी वही पेन घेतलं आणि ते लिहून गेले..
‘‘कुणी जाल का.. सांगाल का..
सुचवाल का त्या कोकिळा..
रात्री तरी गाऊ नको
खुलवू नको अपुला गळा..
आधीच संध्याकाळची बरसात आहे लांबली
परत जाता चिंब चुंबन देत दारी थांबली
कळवाल का त्या कोकिळा की झार होती वाढली
आणि द्याया दाद कोणी रात्र जागून काढली!’’
सकाळी त्यांनी ही कविता मुकुलच्या हातात ठेवली. म्हणाले, ‘मुकी, हे घे. फक्त तुझ्यासाठी..’ महाराष्ट्राच्या या लाडक्या कवीने हे सर्वाग सुंदर गीत, मुकुलजींसाठी लिहिलं आहे, हे फार कमी लोकांना ठाऊक असेल.
ही आठवण जागवली ज्येष्ठ गायक पं. मुकुल शिवपुत्र यांनी गायिलेल्या ‘बुलबुला’ व ‘दिलबरा’ या दोन ध्वनिचित्रफितींच्या प्रकाशनाच्या निमित्ताने. सिंधुदुर्गातल्या आचरा गावी कुमारगंधर्व जयंतीच्या निमित्त सुधाकर आचरेकर व रमाकांत गुळगुळे या दोन ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते या डीव्हीडींचे प्रकाशन नुकतेच झाले.
गंधर्वसभेच्या सचिव प्रिया आचरेकर यांनी सांगितले की, गेल्या वर्षी पं. मुकुल शिवपुत्र यांची आचरे येथील रामनवमी उत्सवात तीन दिवसांची मैफल झाली होती. या स्मरणीय गायनाचे ध्वनिमुद्रण डीव्हीडीच्या स्वरूपात संग्रही राहावे यासाठी या डीव्हीडी तयार करण्यात आल्या आहेत.
पं. कुमार गंधर्वाना तब्बल पस्तीस वर्ष तबल्याची साथ करणारे स्व. वसंतराव आचरेकर आणि मुकुलजींच्या मस्तकावर मायेचं छत्र घरणाऱ्या प्रतिभा आचरेकर यांच्या जन्मगावी कुमारजींची जयंती व नव्या ध्वनिचित्रमुद्रिकांचा प्रकाशन सोहळा घडवण्याच्या निर्णयामागे या दोन्ही व्यक्तींना आदरांजली देण्याचा मुकुलजींचा कृतज्ञ विचार होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंदार सांबारी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सुभाष सांबारी, निवृत्तीनाथ आचरेकर, संदीप नलावडे, नितीन प्रभू यांनी विशेष मेहनत घेतली. आचरा गावचे सरपंच महेश टेमकर, मंदिराचे विश्वस्त कानविंदे, गुळगुळे, प्रकाश सुखटणकर व मिराशी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा