मुकुंद संगोराम mukund.sangoram@expressindia.com

एक दिवसाआड पाणी?, सायकल योजना गुंडाळणार?, मॉलमध्ये विनामूल्य पार्किंग, सिमेंट रस्त्यांचा धडाका कायम, नगरसेवकांनी आपली कामे दोन महिन्यांतच बदलली.. या गेल्या काही दिवसांतील बातम्यांची शीर्षके पाहिली, तर पुणे महानगरपालिका सुस्थितीत आहे, असे अंगणवाडीत जाणारी मुलेही म्हणणार नाहीत. पण आपण किती महान आहोत, याचा डांगोरा पिटण्यात पुण्याचे सगळे नगरसेवक अग्रेसर आहेत. पहिल्याच पावसात शहरात जागोजागी तुंबलेले पाणी हे या महानतेचे खरे दर्शन. पाऊस येईल, येईल म्हणून पुण्याच्या पाणीपुरवठय़ात जराही कपात न करणे आणि आता पावसाने दडी मारल्याबरोबर या सगळ्यांच्या तोंडात गुळणी. ही यांची महानता. कोणी धड बोलायला तयार नाही, कोणी आपापल्या प्रभागात हिंडायला तयार नाही, कोणाला काय करायचे हे माहीत नाही, नागरिकांचे प्रश्न आपणच सोडवायचे असतात याचाही सगळ्यांना विसर, अशा अवस्थेत पुण्याचे हाल तर कुत्राही खाण्यास तयार होणार नाही.

इतके महान लोकप्रतिनिधी लाभल्यानंतर आणखी काय व्हायचे? पुण्याला पाणी पुरवणाऱ्या धरणांतील पाणी झपाटय़ाने कमी होते आहे, हे माहीत असूनही शहरभर सिमेंटच्या रस्त्यांचा धडाका लावणे, ही खरेतर लाज आणणारी गोष्ट. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच रस्त्यांची खोदाई थांबवण्याचा नियम. पण तो धुडकावून स्वच्छ पाण्याचा वापर सिमेंटच्या रस्त्यांसाठी करणारे आपले महान नगरसेवक खरेतर ‘भारतरत्न’ या सन्मानालाच पात्र आहेत. कोण विचारतो, अशी मग्रुरी अंगात पुरेपूर भिनलेल्यांच्या वाटय़ाला सहसा कोणी जात नाही. त्यामुळे विरोधासाठीही विरोध होत नाही. मत दिल्याचा पश्चात्ताप होतो, पण नाइलाज असतो, अशी पुणेकरांची सध्याची स्थिती.

पालिकेच्या मालकीच्या इमारतींवर पडणारा पाऊस साठवण्याची कोणतीही योजना नाही, पण नागरिकांसाठी मात्र पर्जन्य जलसंधारण सक्तीचे. पालिकेच्या मालकीच्या वाहनतळांवर पार्किंगसाठी पैसे, पण खासगी मालमत्ता असलेल्या मॉलमध्ये मात्र मोफत पार्किंगची सक्ती. नगरसेवकांना पालिकेच्या पैशातून मतदारांना भेटवस्तू देण्यास ज्या अधिकाऱ्याने विरोध केला, त्याची बदली आणि दोनच महिन्यांपूर्वी अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या कामांऐवजी नवी कामे सुचवण्यास मात्र पाठिंबा, हे सगळे निर्लज्जपणाच्याही पलीकडचे आहे. पण कोणीच कोणाचे ऐकत नाही व कोणालाच कशाचीच चिंता नाही. अशा अवस्थेत या शहराला काही भविष्य आहे की नाही, अशी शंका यावी.

गेली अनेक वर्षे या पालिकेला साधे पार्किंगचे धोरण ठरवता आलेले नाही. पदपथ भले मोठे करून आणखीनच अरुंद झालेल्या रस्त्यांवर वाहने लावण्यास मनाई करण्याऐवजी ती फुकट लावू द्यावी, असला मूर्ख हट्ट. कोणतीही सेवा हवी असेल, तर त्यासाठी किमान मूल्य मोजावे लागते, हेच अमान्य करून मोफत पार्किंगचा हट्ट धरणारे नगरसेवक हेच या शहराचे खरे शत्रू आहेत. मॉलमध्ये जाणाऱ्या नागरिकांना पार्किंगसाठी जास्त पैसे द्यावे लागतात, हा पालिकेच्या अधिकारातील विषयच नाही. ज्यांना ते पैसे अधिक वाटतात, त्यांनी तेथे जाऊ नये, किंवा त्यासाठी पोलीस वा न्यायालयात दाद मागावी.

पण अशांचा पुळका आणत, पालिकेच्या मालकीच्या नाटय़गृहांमधील पार्किंग मात्र सशुल्क ठेवत मॉलमध्ये फुकट पार्किंगचा आदेश देत स्वत: किती महान आहोत, हे सिद्ध करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न करणाऱ्या कारभाऱ्यांना दंडवतच.

शहरात किमान पुरेसे पाणी मिळत नाही, याकडे लक्ष देण्याची गरज यापैकी एकाही नगरसेवकाला वाटत नाही. अतिप्रचंड प्रमाणातील गळतीमुळे वाया जाणारे पाणी हा नगरसेवकांच्या चिंतेचा विषयच असू शकत नाही. पीएमपीसारखी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बकालीच्याही पलीकडे जात असताना, नगरसेवकांना त्याचे जराही सोयरेसुतक नाही. आमदार झोपलेले, नगरसेवक सुस्त व खासदारांना आता सगळेच नवे. कारभाऱ्यांच्या महानतेचे गोडवे गाऊन गाऊन गळा बसलेले पुणेकर आता कंटाळले आहेत. त्यांना यापुढे खरेच काही सुयोग्य घडू शकेल, याची खात्री राहिलेली नाही. हे असेच आणखी किती काळ चालणार?