मुकुंद संगोराम mukund.sangoram@expressindia.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘पाणी जपून वापरा’ अशी पाटी तुम्ही पुण्यात कुठे तरी पाहिली आहे का? नाही ना! याचे कारण पुण्यात पाणी भरपूर वापरायचे असते, असाच समज आहे. मराठवाडय़ातील गावांमध्ये सध्या कसेबसे दर माणशी दर दिवशी ७० लीटर पाणी मिळते आहे. येत्या काही दिवसांत ते ३० लीटर मिळण्याची शक्यता आहे. एवढय़ा पाण्यात अंघोळीपासून कपडे धुण्यापर्यंत आणि स्वच्छतागृहांपासून ते मोटारी धुण्यापर्यंत सगळे काही करणे अपेक्षित आहे. सोलापूर, लातूर यांसारखी शहरे पाण्यासाठी किती तहानलेली आहेत, याच्या बातम्या सतत येत असतात. लातूरला तर रेल्वेने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली. आपण पुणेकर फारच भाग्यवान. फार म्हणजे फारच. इतर शहरांचे आकडे पाहिले तर आपल्याला लाज वाटावी, अशी ही परिस्थिती. पण आपण त्यापासून कधीच धडा घेत नाही. कारण आपल्याला आपले लोकप्रतिनिधी हे देव आहेत, असे वाटते. ते पाऊसही पाडू शकतात आणि त्यामुळे पुण्यात पाणीकपात वगैरे कधी होण्याची शक्यताच नाही. लोकप्रतिनिधींनाही असेच वाटते. पाणीकपात केली, तर मतदार चिडतील, त्यामुळे काहीही करून त्यांना भरपूर पाणी मिळालेच पाहिजे, असा त्यांचा आग्रह. बरे, असे फक्त सत्ताधाऱ्यांनाच वाटते, असे नाही. विरोधकांचेही तेच मत आहे. हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे, म्हणून घसा खरवडून ओरडणारे काँग्रेस-राष्ट्रवादीचे नगरसेवक काय किंवा मुख्यमंत्र्यांकडे धाव घेऊन पाणीकपात न करण्याचे आदेश द्यायची विनंती करणारे भाजपचे नगरसेवक काय.. या सगळय़ांचे गणित फारच कच्चे आहे. ध्यानी‘मनी’ असले तरीही त्यांना साधी आकडेमोड काही करता येत नाही. आकडे तोंडावर फेकायचे पण त्याचा अर्थ विचारला, तर गाळण उडायची, हे आजचे वास्तव. मराठवाडय़ात दर माणशी दर दिवशी ३० लीटर पाणी मिळणार आहे. पुणेकरांना आजच्या दिवशी किती मिळत आहे, माहिती आहे? हा आकडा ऐकून तुमच्या डोळय़ांतले पाणीही आटून जाईल. पुणेकरांना आज दर दिवशी दर माणशी ३३७.५० लीटर एवढे पाणी मिळते. म्हणजे एवढे पाणी अगदी मोजून मापून पाटबंधारे खात्याकडून मिळते. याचा अर्थ सध्या जे प्रतिदिन १३५० दशलक्ष लीटर एवढे पाणी आपली महान महानगरपालिका रोज घेते आहे, त्याला फक्त चाळीस लाख लोकसंख्येने भागले, की हा आकडा हाती येतो. मग महापालिका म्हणते, चाळीस लाख नव्हे, पुण्याची लोकसंख्या पन्नास लाख आहे. बरे हाही आकडा मान्य केला, तर दरडोई २७० लीटर एवढे पाणी पुणे महानगरपालिका रोज मिळवते आहे. जर १५५ लीटर हे आदर्श प्रमाण मानून पाणी घ्यायचे तर पालिकेला फक्त प्रतिदिन ७७५ दशलक्ष लीटर एवढेच पाणी मिळायला हवे. तरीही सगळे लोकप्रतिनिधी जो ओरडा करत आहेत, तो हक्काच्या पाण्याचा. बाबांनो, तुमच्या हक्काचे पाणी फक्त प्रतिदिन ७७५ दशलक्ष लीटर  एवढेच असताना, तुम्ही सगळे रोज प्रतिदिन १३५० दशलक्ष लीटर पाण्यासाठी रस्त्यावर येत आहात. शोभते का तुम्हाला? शिवाय लष्कर जलकेंद्राला बंद नळातून पाणी दिल्याने तुमचे आणखी प्रतिदिन १२५ दशलक्ष लीटर वाचत आहेत. म्हणजे पुण्याला सध्या प्रतिदिन १४५० दशलक्ष लीटर पाणी मिळते आहे, म्हणजेच प्रत्येकाच्या नावावर २९५ लीटर पाणी मिळते आहे. आपल्याला लाजच वाटायला हवी ना याची. पण आपल्या कोणाच्याही घरात एवढे पाणी येत नाही हीही वस्तुस्थिती आहे. याचा अर्थ पाणी कुठे तरी मुरते आहे. ते कुठे मुरते आहे, हे पर्वती जलकेंद्रासमोर रोज उभ्या असलेल्या टँकरच्या लांबलचक रांगेवरून सहज कळू शकेल. टँकरमाफियांच्या विळख्यात असलेल्या पुणे शहराला वाचवण्याची कुणाचीही तयारी नाही, कारण त्यात सगळय़ांचेच हितसंबंध गुंतलेले आहेत. त्यांची धन व्हावी, म्हणून हे सगळे राजकारणी आपल्याला वेठीला धरत आहेत. सांभाळून राहा आणि पाणी मात्र जपूनच वापरा.