मुकुंद संगोराम mukund.sangoram@expressindia.com
उन्हाळा सुरू होण्याची सर्वात जास्त वाट कोण पाहत असेल, तर ते टँकरवाले. तसं उन्हाळ्यात टँकरच्या मागणीत जरा जास्त वाढ होते एवढंच. नाहीतर वर्षभर शहराच्या अनेक भागात टँकरच्या फेऱ्या मारायला लावणारे लोकप्रतिनिधी आणि पाणी खात्यातील अधिकारी यांच्यासाठी तर टँकर हे फारच महत्त्वाचं साधन. त्यामुळे एकाच दगडात अनेक पक्षी मारता येतात त्यांना. एकतर जिथं पाणी पोहोचत नाही, तिथे पाणी पोहोचवण्याऐवजी टँकर पाठवण्याने आपली लायकी लपून राहते. दुसरे म्हणजे टँकर चालकांना भरपूर पैसे मिळतात. तिसरे म्हणजे टँकर पाठवण्यावर कोणतेही निर्बंध नसल्याने कोणी त्याला विरोध करत नाही. शिवाय हे टँकर शहरातील अतिशय प्रतिष्ठित, तालेवार आणि सत्तेशी फारच जवळचा संबंध असणाऱ्यांच्या मालकीचे असतात. असं अनेक राजकारण्यांनी निवृत्त होता होता दोन-चार टँकरमध्येही पैसे गुंतवल्याची चर्चा सतत होत असते. त्याला कोणी पुरावा मात्र देत नाही. पुरावा दिला नाही, तरी टँकरवाल्यांची मिजास पाहता हे अशक्य असेलच असे नाही.
हवे त्याला हवे तेवढे पाणी देणे ही पालिकेची व्यवस्था असू शकत नाही. दरडोई दरदिवशी १५० लिटर पाणी देण्याची कायदेशीर जबाबदारी पालिकेची. ती पार पाडण्यासाठी पालिका धरणांतून दरडोई दरदिवशी किमान तीनशे लिटर एवढं पाणी उपसते. दुप्पट पाणी उपसूनही शहरात सर्वाना पाणी का मिळत नाही, हा प्रश्न गेली अनेक दशके पुणेकरांना सतावतो आहे. त्याचे उत्तर या टँकरच्या हरकतीच्या धंद्यात दडलेलं आहे. दिवसा चारपाच तास पाणी घरपोच करूनही शहरातील अनेक भागात पाणी मिळतच नाही. अगदी डेक्कन जिमखान्यासारख्या उच्चभ्रूंच्या वसाहतीतही काही बंगल्यांना पाणी मिळत नाही. त्यांचे तोंड बंद करण्यासाठी तिथे रोजच्या रोज टँकर पाठवण्याची योजना कित्येक महिने सुरूच राहिली आहे.
पाण्याचा मूळ प्रश्न सोडवण्यापेक्षा तो तसाच भिजत ठेवणं सर्वाना आवडत असावं बहुतेक. त्यामुळे टँकरच्या फे ऱ्या सुरू ठेवता येतात आणि टँकरमालकांनाही खूश ठेवता येतं. हे टँकरवाले पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी घेतात. ते त्यांना विशिष्ट किमतीतच विकता येतं. पण प्रत्यक्षात हे टँकर पाण्याचा थेट काळाबाजार करतात. म्हणजे ज्यांना हवंय, त्यांना न देता जे अधिक पैसे देतात, त्यांनाच हे पाणी मिळतं. पुणे आणि परिसरात अशी टँकरवाल्यांची टोळी गेली अनेक वर्षे कार्यरत आहे. त्यांना लोकप्रतिनिधींपासून ते प्रशासनापर्यंत अनेकांचे अभय आहे. त्यामुळे या टँकरवर जीपीएस प्रणाली बसवण्याचे सगळे प्रयत्न या टँकरटोळ्यांनी हाणून पाडले होते. त्यांना त्याबद्दल कोणतीही शिक्षा मिळाली नाही. उलट त्यांचे सगळे व्यवहार सुखेनैव सुरू राहिले. अखेर ही प्रणाली टँकरवर बसवण्यात आली खरी. पण त्यावर लक्ष देण्याची यंत्रणा कार्यरतच ठेवण्यात आली नाही. हे असं घडतं, याचा अर्थच टँकरटोळ्यांना वरिष्ठांचे आशीर्वाद आहेत.
दुष्काळात टँकरटोळ्यांची चलती असते. पुण्यात तर गेल्या वर्षी उत्तम पाऊस झाला. पुण्याला पुरेल एवढे वर्षभराचे पाणी मुठा नदीत सोडून देण्यात आले, तरीही येत्या जून महिन्यापर्यंत पुरेल, एवढा पाणीसाठा पुण्यासाठीच्या चारही धरणांत शिल्लक आहे. मग तरीही ही टँकरने पाणी पुरवण्याची घाई का? याचे उत्तर सरळ आहे. टँकरच्या धंद्यात अनेकांचा वाटा आहे. तो वाटा घरपोच होण्यासाठी तो धंदा उत्तमपणे सुरू राहणे फारच आवश्यक. समान पाणीपुरवठय़ाच्या योजनेचं काय झालं, असला फालतू प्रश्न कोणीही पुणेकर विचारणार नाही. कारण ते घडणारच नाही, यावर त्याचा ठाम विश्वास आहे. समान पाणीपुरवठा राहू दे, पण रोज घरातल्या नळापर्यंत पाणी पोहोचवण्याचं कर्तव्य पार न पाडणाऱ्या पालिकेला टँकरमध्येच एवढा रस का? याचं उत्तर मात्र मिळालंच पाहिजे.