अखेर राष्ट्रीय हरित लवादाने नदी सुधार प्रकल्पातील सर्व अडथळे दूर करून त्यास हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे आता पुणे शहराच्या मध्यातून वाहणाऱ्या मुठा नदीचे स्वरूप एकदम पालटणार असून, शहरातील नागरिक त्यामुळे नक्की हर्षभरित होणार, यात शंका बाळगण्याचे कारण नाही. सुमारे पाच हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे आता दुर्गंधीयुक्त नदीच्या सांडपाण्यातून नौकानयनाची अपूर्व संधी पुणेकरांना मिळणार आहे. तिचा लाभ घेता यावा, यासाठी पुणेकरांना खूप आधीपासून नोंदणी करावी लागण्याची शक्यता आहे! नदीच्या पात्रात भिंत उभी करून तिचे पात्र चाळीस टक्क्यांनी कमी केल्यामुळे छोट्या पात्रात सतत पाणी राहील आणि त्यामुळे या नौकानयनाचे मनोहारी दृश्य अनुभवायला मिळणार असल्याचे या प्रकल्पाच्या मसुद्यात म्हटले आहे. त्याहूनही अधिक महत्त्वाचे म्हणजे, या प्रकल्पामुळे नदीच्या पूररेषेत आलेली सुमारे १८०० एकर जमीन पूररेषेबाहेर येणार असून, ती अन्य कारणांसाठी उपयोगात आणता येणार आहे. हे सारे किती रंजक आणि देखणे आहे!
यंदाच्या पावसाळ्यात ३०-३५ हजार क्युसेक वेगाने धरणातील पाणी मुठा नदीत सोडण्यात आले, तेव्हा जो काही हाहाकार उडाला, त्याच्या आठवणी ताज्याच असतील. पण १९९५-९६ मध्ये याच नदीपात्रातून सुमारे ८५ हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले होते, तेव्हा ते पुणे महानगरपालिकेच्या समोरील रस्त्यावर उतरले होते. गेल्या तीन दशकांत नदीपात्राच्या परिसरात झालेल्या भव्यदिव्य बांधकामांमुळे यदाकदाचित पुन्हा ८५ हजार क्युसेक पाणी सोडायची वेळ आलीच, तर नदीपात्रातील बोटी कामाला येणार नाहीत. तेव्हा पात्रातील पाणी पात्र सोडून परिसरातील इमारतींच्या पहिल्या दुसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचलेले असेल. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला पोहोचण्यासाठी बोटीतून प्रवास करताना नगरसेवकांचे डोळे कसे भरून येतील! तेव्हा नदी सुधार प्रकल्पामुळे झालेल्या सौंदर्य विकासाचे रूप साऱ्या पुणेकरांना डोळे भरून पाहता येणार आहे.
हेही वाचा >>> पुणे, पिंपरी चिंचवडसह उपनगराला जोरदार पावसाने झोडपले
आत्ता नदीपात्रात केवळ सांडपाण्याचे ओहोळ आहेत. नदीसुधार प्रकल्पामध्ये नदीपात्रात स्वच्छ केलेले सांडपाणी सोडण्यात येणार असल्याचे प्रकल्पकर्त्यांचे म्हणणे आहे. असे सांडपाणी स्वच्छ करण्यासाठी जे सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प उभे करावे लागतील, त्याचा अजून पत्ताच दिसत नाही. तत्कालीन महापालिका आयुक्त कुणालकुमार यांनी २०१८ मध्ये एका सर्वसाधारण सभेत असे जाहीर आश्वासन दिले होते, की येत्या सहा वर्षात हे शुद्धीकरण प्रकल्प पूर्ण होतील आणि नदीपात्रात केवळ शुद्ध पाणीच प्रवाही राहील. आता सहा वर्षे उलटून गेली. दरम्यानच्या काळात आयुक्तही बदलून गेले. सांडपाणी प्रकल्पाचे पुढे काय झाले, हे कुणालाच ठावे नाही. उलट या काळात अस्तित्वात असलेले शुद्धीकरण प्रकल्प बंद करून त्या जागा कुणा बिल्डरला आंदण म्हणून देण्याच्या हालचाली सुरू झाल्याची कुजबूज सुरू झाली. त्यामुळे नदीसुधार प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर डासांच्या संगतीत राहण्याची मनाची तयारी करणे अधिक योग्य! नदीच्या परिसरातील जैवविविधतेमध्ये डासांचे अस्तित्व असतेच की!
हेही वाचा >>> सिद्धेश कदम यांच्या मर्सिडीज भेटीचे गौडबंगाल! महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या दाव्यात विसंगती; वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मौन
समजा भविष्यात ढगफुटी झालीच, तर काय करायचे, हे त्या वेळचे नगरसेवक आणि प्रशासन पाहून घेईल. त्याची आत्तापासूनच काळजी करण्याचे काही कारण नाही. आत्ता नदीपात्राच्या सुशोभित परिसराचे नयनरम्य चित्र डोळ्यात साठवणे अधिक महत्त्वाचे. नदीपात्रात उंच भिंत बांधल्यामुळे कदाचित ती ओढ्यासारखी भासेलही. पण जागोजागी हीच ती मुठा नदी, असे फलक लावले, की पुणेकरांच्या ते नक्की लक्षात येईल. त्यामुळे भिडे पूल पाण्याखाली गेला का, याची सतत चौकशी करणाऱ्या पुणेकरांना छत्रपती संभाजी महाराज आणि नवा पूल पाण्याखाली गेला का, याची चौकशी करावी लागेल, एवढेच! महापालिकेची निवडणूक कधीतरी होईलच. त्या वेळी निवडून येण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना आत्तापासूनच दिवसाची १८०० एकर जमिनीच्या वापराची चिंता लागून राहिली आहे. तसे पुणेकर सहनशील आणि शांत आहेत. तेव्हा त्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे नदी पात्राचे देखणे रुपडे हेच तर खरे समाधान!!
mukundsangoram@gmail.com