‘आयुष्यात येणाऱ्या आव्हानांनी निराश न होता पुढे चालत राहणे आणि आपले ध्येय गाठण्यासाठी धोका पत्करणे आवश्यक आहे,’ असा संदेश भारताचे अमेरिकेतील दूत ज्ञानेश्वर मुळे आणि स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुपचे संस्थापक संदीप वासलेकर यांनी रविवारी दिला. ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मुळे आणि वासलेकर यांची एकत्रित मुलाखत घेण्यात आली.
साहित्य नगरीत लक्ष्मीबाई टिळक सभामंडपात झालेल्या या मुलाखतीच्या कार्यक्रमाला रसिकांनी मोठी गर्दी केली होती. प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी वासलेकर आणि मुळे यांना बोलते केले. सभामंडपात जागा न मिळाल्यामुळे भोवताली बसून श्रोते कार्यक्रम ऐकत होते. अखेर मंडपाच्या एका बाजूचे पडदे दूर करून मंडप खुला करण्यात आला. वीज प्रवाह खंडीत झाल्यामुळे मुलाखतीत व्यत्यय येऊनही श्रोत्यांचा उत्साह कायम होता. रोमांचक वाटावा असा या दोन्ही तज्ज्ञांचा प्रवास, परराष्ट्रांमधील किस्से, विकास अशी विविध विषयांची सैर या मुलाखतीतून घडली.
आजपर्यंतच्या प्रवासात आलेल्या आव्हानांबद्दल मुळे म्हणाले, ‘परदेशात पहिल्यांदा गेलो, तेव्हा न्यूनगंड होताच. शहरी राहणीमानाबद्दल काही समज होते. मात्र माझ्या बरोबरचे लोक बघून जाणीव झाली की जे माझ्याकडे आहे ते त्यांच्याकडे नाही. या मातीच्या संस्कारांनी माझा पाया पक्का केला आहे याची जाणीव झाली आणि मी उभा राहिलो.’ प्रत्येक माणसात सहिष्णुता आणि असहिष्णुता दोन्ही असते. त्याचा योग्य समतोल राखायला हवा, असेही ते म्हणाले.
यापुढील आव्हानांवर वासलेकर म्हणाले, ‘येणाऱ्या काळात विज्ञान आणि तंत्रज्ञान खूप मोठी आव्हाने उभे करणार आहे. जैविक क्रांती, रासायनिक अस्त्रे हे देखील जगापुढे आव्हान असेल. पुढील किमान पन्नास वर्षांचा विचार करून विकासाची दिशा ठरवली पाहिजे.’
संमेलनाचे रंग ढंग
प्रकाशकांच्या युक्तया
संमेलनात दोन भागात विभागल्या गेलेल्या ग्रंथदालनात साडेतीनशे गाळे आणि साधारण शंभर प्रकाशने आहेत. वाचकांना आकर्षून घेण्यासाठी दाराशी उभे राहून पत्रके वाटणे, गर्दी दिसेल त्या ठिकाणी जाऊन प्रदर्शनातील आपल्या गाळ्यावर येण्याचे निमंत्रण देणे याबरोबरच अनेक युक्तया प्रकाशक करत आहेत. ग्रंथदालनात लहान मुले करतात तशी तरुणांची आगगाडी धावत होती. नव्यानेच प्रकाशित झालेल्या एका पुस्तकाची जाहिरात करण्यासाठी आपल्या गाळ्याचा क्रमांक आणि पुस्तकाचे नाव ओरडत जाणाऱ्या या आगगाडीने गाळ्याकडे अनेकांना आकर्षून घेतले. एका प्रकाशनाने आपल्या गाळ्यावर वेगवेगळे प्रतिबिंब दिसणारे आरसे लावले आहेत. पुस्तक विकत घेणाऱ्या व्यक्तीची मोफत व्यक्तिमत्त्व चाचणी करून देण्याचे आमिष ठेवण्यात आले होते. काही प्रकाशकांनी उभ्या केलेल्या सेल्फी स्टँडलाही वाचकांकडून प्रतिसाद मिळत होता. आपल्या पुस्तकांची माहिती देणारे दृकश्राव्य कार्यक्रम, लेखकांच्या मुलाखतीही दाखवण्यात येत होत्या.
अर्कचित्रे, स्वाक्षऱ्या आणि कविता लिहिलेल्या शबनम
ग्रंथदालनात माजी संमेलनाध्यक्षांच्या रेखाटलेल्या अर्कचित्रांचा गाळा, मराठीतून स्वाक्षरी तयार करून देणारा गाळा, कविता लिहिलेल्या शबनम यांच्या गाळ्यांनाही मोठा प्रतिसाद मिळत होता. औषधोपचार, पाककृती, अभ्यासपूरक साहित्य यांच्या गाळ्यांवर सर्वाधिक गर्दी दिसत होती.
अविरत चालणारा कविकट्टा
संमेलनाचे तीनही दिवस अखंडपणे आवाज ऐकू येणारे दालन होते कविकट्टय़ाचे. औपचारिक उद्घाटन समारंभानंतर मुख्य मंडपातच कविसंमेलन झाले. मात्र रविवारचा संपूर्ण दिवस कविकट्टा अखंड वाहात होता. वेगवेगळे विषय, भाषेचा लहेजा आणि शैलीत कविता सादर केल्या जात होत्या. दुपापर्यंत मोजकेच श्रोते असणाऱ्या या मंडपातही रविवार दुपारनंतर गर्दी झाली.
ज्ञानेश्वर मुळे आणि संदीप वासलेकर यांच्या मुलाखतीला उत्स्फूर्त प्रतिसाद
८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मुळे आणि वासलेकर यांची एकत्रित मुलाखत घेण्यात आली.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 18-01-2016 at 03:25 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mule wasalekar interview