संपूर्ण जून महिना कोरडा गेल्याने अनेक धरणांची पाणीपातळी खालावली असून, धरणात बुडालेल्या वैभवाच्या जुन्या खुणा पाण्याबाहेर येऊन डोकावू लागल्या आहेत. नव्वद वर्षांपूर्वी ज्या ज्योतिरूपेश्वराची शपथ घेऊन मुळशीचा सत्याग्रह करण्यात आला, त्या मंदिराचा कळस १९७२ च्या दुष्काळानंतर या वर्षी पहिल्यांदाच अध्र्याच्यावर पाण्याबाहेर आला आहे.
भरपूर पावसाचा प्रदेश आणि निसर्गरम्य वातावरणामुळे मुळशी तालुका पर्यटकांना कायम आकर्षित करीत आला आहे. मुळशी तालुक्यात नव्वद वर्षांपूर्वी ऐतिहासिक मुळशी सत्याग्रह झाला होता. शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी वाचविण्यासाठी महात्मा गांधींच्या अहिंसेच्या मार्गाने दिलेला पहिला लढा म्हणून मुळशीचा सत्याग्रह इतिहासात प्रसिद्ध झाला. या सत्याग्रहाच्या अनेक घडामोडी ज्योतिरूपेश्वराच्या मंदिराभोवती घडल्या. ज्योतिरूपेश्वराची शपथ घेऊनच या सत्याग्रहाची सुरुवात झाली होती. सेनापती बापट यांच्याबरोबरच महाराष्ट्रातील अनेक थोरांनी या सत्याग्रहात मोलाचे योगदान दिले. मात्र या लढय़ाला अपयश आले आणि मुळशी धरण पूर्ण झाले. त्यात मुळशीतील बावन्न गावे आणि असंख्य छोटी-मोठी मंदिरे बुडाली. त्यात वडगावमधील मल्लिकार्जुन आणि आकसईतील ज्योतिरूपेश्वर ही महादेवाची दोन स्वयंभू मंदिरेही बुडाली. ज्योतिरूपेश्वरावर येथील लोकांची प्रचंड श्रद्धा होती. या ज्योतिरूपेश्वराची माघ पौर्णिमेची यात्रा त्यावेळी पंधरा दिवस चालत असे. मंदिराबरोबर त्या परंपरा आणि रितीरिवाजही काळाच्या ओघात बुडाले. आता ज्योतिरूपेश्वराचा कळस दिसायला लागल्याने या जुन्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या.
मुळशी धरणाची पातळी खालावल्याने ज्योतिरूपेश्वर मंदिराच्या कळसाचे दर्शन
नव्वद वर्षांपूर्वी ज्या ज्योतिरूपेश्वराची शपथ घेऊन मुळशीचा सत्याग्रह करण्यात आला, त्या मंदिराचा कळस १९७२ च्या दुष्काळानंतर या वर्षी पहिल्यांदाच अध्र्याच्यावर पाण्याबाहेर आला आहे.
आणखी वाचा
First published on: 15-07-2014 at 03:05 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mulshi dam satyagraha tempel farmers