Pune Mulshi Crime News : मुळशी, पिंपरी चिंचवड या भागात अनेक गुंडांचा हैदोस वाढला आहे. या भागात परवान्यासह अथवा विना परवाना शस्त्र बाळगणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. विना परवाना शस्त्र बाळगणाऱ्यांवर झालेल्या कारवायांच्या बातम्या अधून मधून समोर येत असतात. दिखाव्यासाठी, लोकांना घाबरवण्यासाठी शस्त्र बाळगणारे, त्याचा धाक दाखवणारेही बरेच जण आहेत. वाढदिवसाला तलवारीने केक कापणाऱ्यांवर कारवाया झाल्याचं देखील आपण पाहिलं आहे. अशाच एका दिखावा करणाऱ्या ‘भाई’च्या पिंपरी चिंचवड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. मुळशी येथील एका बांधकाम व्यावसाचिकाने लोकांना भीती दाखवण्यासाठी एका रेस्तराँमध्ये गोळीबार केला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्यावसायिकाने म्हाळुंगे परिसरातील एका रेस्तराँच्या भिंतीवर गोळीबार केला होता. लोकांना बंदुकीचा धाक दाखवण्यासाठी त्याने गोळीबार केला होता. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली असून रविवारी हिंजवडी पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा >> Lonavala Rain : लोणावळा, मावळमध्ये अतिमुसळधार पाऊस, कार्ला गडाला धबधब्याचे स्वरूप

बाळासाहेब दराडेविरोधात गुन्हा दाखल

बाळासाहेब व्यंकटराव दराडे (४१) असं या आरोपीचं नाव आहे. तो मुळशीमधील सुसगावचा रहिवासी आहे. हिजवडी पोलिसांनी त्याच्याविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम ११०, १२५ आणि भारतीय शस्त्रास्र कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची माहिती देताना पोलीस निरीक्षक कन्हैय्या थोरात म्हणाले, “आरोपी बाळासाहेब दराडे हा शुक्रवारी (२ ऑगस्ट) रात्री हॉटेल इमेज या एका फॅमिली रेस्तराँमध्ये गेला होता. तो या रेस्तराँच्या पहिल्या मजल्यावरील वातानूकुलित विभागात बसला होता. मात्र त्यावेळी त्याने लोकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी रेस्तराँच्या भिंतीवर गोळीबार गेला. त्यानंतर आम्ही त्याला अटक केली आहे. आरोपीने स्वतःबद्दल माहिती देताना सांगितलं की तो एक बांधकम व्यावसायिक आहे.”

हे ही वाचा >> पावसामुळे पुण्यात शहरभर खड्डे; वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ‘या’ ३० चौकांत जड वाहनांना बंदी

रेस्तराँमध्ये गोळीबार करून इतर ग्राहकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न

पोलिसांनी सांगितलं की “बाळासाहेब दराडे याने केलेल्या गोळीबारामुळे रेस्तराँमध्ये आलेल्या लोकांमध्ये भीती निर्माण झाली होती. काहीजण रेस्तराँमधील त्यांच्या टेबलवरून उठून दूर पळून गेले.” दरम्यान, आरोपीकडे बंदूक बाळगण्याचा परवाना असल्याचं तपासात समोर आलं आहे. या प्रकरणानंतर पोलिसांनी दराडे याला न्यायालयासमोर हजर केलं. त्यानंतर पोलिसांनी त्याला एक दिवसाची कोठडी सुनावली आहे. तसेच त्याची बंदूक पोलिसानी ताब्यात घेतली असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. त्यावेळी रेस्तराँमध्ये असलेल्या इतर ग्राहकांकडे या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mulshi man opens fire in restaurant to show off pimpri chinchwad police arrested asc