सर्वकष वाहतूक आराखडय़ात दळवळणाच्या सुविधांना प्राधान्य

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सार्वजनिक वाहतुकीसह खासगी वाहतुकीमध्ये समन्वय राहावा, यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पुणे मेट्रोपॉलिटन रिजनल डेव्हलमेंट अ‍ॅथॉरिटी- पीएमआरडीए) र्सवकष वाहतूक आराखडय़ात (कॉम्प्रिसेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन- सीएमपी) दळणवळणाच्या सुविधांना प्राधान्य देण्यात आले आहे. आराखडय़ात १८ ठिकाणी बहुउद्देशीय स्थानके(मल्टी नोडल ट्रान्सपोर्ट हब ) प्रस्तावित आहेत. याशिवाय पुणे शहराला जोडण्यासाठी विविध मार्गावर पाच ठिकाणी एसटीची स्थानकेही प्रस्तावित करण्यात आली आहेत.

पुणे, पिंपरी-चिंचवडसह  हिंजवडी, चाकण, वाघोली, तळेगाव या परिसरातील २ हजार १७२ चौरस किलोमीटर लांबीच्या क्षेत्रफळासाठी पीएमआरडीएने वाहतुकीचा र्सवकष आराखडा तयार केला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आणि ग्रामीण भागातील एकत्रित वाहतुकीचा यामध्ये विचार करण्यात आला असून वाहतुकीच्या पायाभूत सुविधा आणि दळवळणाची बहुउद्देशीय स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे.

मेट्रोच्या आठ नव्या मार्गिका, २१० किलोमीटर लांबीचे जलदगती सेवेचे (बस रॅपिड ट्रॅन्झिट- बीआरटी) जाळे, ७० किलोमीटर लांबीची लाईट मेट्रोबरोबरच दळवळणाची बहुउद्देशीय स्थानके विकसित करण्याचे प्रस्तावित आहेत. मेट्रो, पीएमपी या सार्वजनिक वाहतुकीबरोबरच रिक्षा, दुचाकी, कॅब अशा खासगी वाहनांचा बहुउद्देशीय स्थानकातून समन्वय साधण्यात येणार आहे.

महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून शहरात स्वारगेट आणि शिवाजीनगर येथे तर पिंपरी-चिंचवडमध्ये निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात बहुउद्देशीय स्थानक प्रस्तावित आहे. पीएमआरडीएकडून बालेवाडी येथे या प्रकारचे स्थानक विकसित करण्यात येणार आहे. या चारही स्थानके उभारणीची प्रक्रियाही सुरू झाली आहे. त्यात आता नाशिक फाटा, हिंजवडी, चांदणी चौक, वारजे, वडगांव बुद्रुक, खराडी, पूलगेट आणि वाकड या आठ ठिकाणी बहुउद्देशीय स्थानके प्रस्तावित करण्यात आली आहेत. याशिवाय कात्रज, हडपसर, वाघोली, मोशी, वल्लभनगर, चिंचवड येथेही टप्प्याटप्प्याने बहुउद्देशीय स्थानेक विकसित करण्याचे नियोजन पीएमआरडीएकडून करण्यात आले आहे. सार्वजनिक वाहतुकीसह खासगी वाहतुकीच्या सर्व सुविधा या माध्यमातून प्रवाशांना उपलब्ध होणार आहेत, असा दावा पीएमआरडीएकडून करण्यात आला आहे.

शहरातील स्वारगेट, पुणे स्टेशन, शिवाजीनगरसह पिंपरी-चिंचवडमधील बसस्थानकांमध्ये प्रवाशांची होणारी मोठी गर्दी आणि वाहतूक कोंडीमध्ये प्रवाशांचा जाणारा वेळ लक्षात घेऊन पाच ठिकाणी बसस्थानके उभारण्याचे विचाराधीन आहे. मुंबई रस्त्यावरील तळेगाव, नगर रस्त्यावरील लोणीकंद, सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोर, सातारा रस्त्यावरील मांगडेवाडी आणि नाशिक रस्त्यावरील मोशी येथे ही स्थानके प्रस्तावित आहेत. पुणे रेल्वे स्थानक आणि वल्लभनगर येथील स्थानकांच्या पुनर्विकासाचाही प्रस्ताव र्सवकष वाहतूक आराखडय़ात आहे. शहरातील वाहतुकीचा ताण आणि प्रवाशांना मध्यवर्ती भागात यावे लागत असल्यामुळेच शहराच्या हद्दीबाहेर मात्र शहराला जोडणाऱ्या मार्गावर ही स्थानके उभारण्याची शिफारस आराखडय़ात करण्यात आली आहे.

पीएमपीसाठी ३ हजार गाडय़ांची शिफारस

पीएमपीच्या दररोज १ हजार ३८२ गाडय़ा रस्त्यावर असून ३७१ मार्गावर सरासरी ७७० प्रवासी एका बसमधून प्रवास करतात, असा निष्कर्ष र्सवकष वाहतूक आराखडय़ात व्यक्त करण्यात आला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात पीएमपीची १३ आगारे आणि २ हजार ३९३ थांबे आहेत. दररोज १० लाख प्रवासी पीएमपीमधून प्रवास करतात. त्यामुळे मात्र मार्गाचे सुसूत्रीकरण करण्याबरोबरच प्रवाशांच्या सुविधेसाठी पीएमपीच्या ताफ्यात किमान ३ हजार गाडय़ा अपेक्षित आहेत. तीन हजार गाडय़ा ताफ्यात आल्यानंतर पुढील १० वर्षांत गाडय़ांची संख्या ३ हजार ८०० असावी, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Multi purpose stations to coordinate private vehicles
Show comments